Ajit Pawar: "दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊद्या..."; अजित पवारांचे रोखठोक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 03:57 PM2022-09-20T15:57:13+5:302022-09-20T15:57:50+5:30
अजितदादांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आव्हान
Ajit Pawar on Foxconn Vedanta Deal: वेदांतासारख्या प्रकल्पातून राज्यात गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी या चांगल्या कामाला नक्कीच पाठिंबा देईल. मात्र त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. काही पक्षातील लोक, आमच्यापैकी कोणी वेगळया मागण्या केल्या होत्या म्हणून प्रकल्प गेला, असे आरोप करत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना असं अजिबात झालेले नाही. कारण नसताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. जर कुणाला वाटत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार, एजन्सी तुमच्या हातात आहेत. चौकशी करावी पण विधाने करुन बेरोजगारांमध्ये गैरसमज निर्माण करु नये. वास्तविक असं काही घडलेले नाही तरी पण चौकशी करायची असेल तर जरुर करा. आताच 'दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊद्या, असे थेट आव्हान अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर अनेकदा चर्चा झाली आहे. या प्रकल्पातून राज्यातील तरुण बेरोजगांरामध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावून तो प्रकल्प पुन्हा राज्यात आणावा. @AjitPawarSpeaks#NCPpic.twitter.com/aeWxpA1zCl
— NCP (@NCPspeaks) September 20, 2022
वेदांताचा जो फॉक्सकॉन प्रकल्प होता, त्याबद्दल चर्चा बरीच झाली. आता मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. त्यांनी याचा पाठपुरावा करावा तो त्यांचा अधिकार आहे. बेरोजगारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावावे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत असा आमचा प्रयत्न सुरू होता. काही जण अफवा पसरवत आहेत. चुकीच्या बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहेत की, वेदांताला नाकारलं हे साफ खोटं आहे. काहीजण बोलत आहेत की, अजून प्रकल्प आणणार आहे. मी पुन्हा महाराष्ट्राला सांगतो महाराष्ट्राच्या हिताचे जे-जे प्रकल्प असतील ते-ते प्रकल्प महाराष्ट्रामध्ये यावेत. फक्त त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये ही बाब सरकारने लक्षात ठेवावी आणि त्याची नोंद घेतली पाहिजे, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले. जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमच्या सरकारमुळे प्रकल्प हातातून गेला असा आरोप साफ खोटा आहे. त्यांच्या हातात सरकार आहे, यंत्रणा आहेत. त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमांतून चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल, असे अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले.
— NCP (@NCPspeaks) September 20, 2022
ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल...
काल ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. टिव्ही चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. की अमुक पक्षाला सर्वाधिक जागा वगैरे परंतु या ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत हे त्रिवार सत्य आहे. एकंदरीतच जे आकडे दाखवले जात आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे यातून सर्वांनीच बोध घ्यायला हवा. ही निवडणूकीची रंगीत तालीम आहे, असे ते म्हणाले. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादी विचाराचे जे लोक निवडून आले आहेत त्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत. माध्यमांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाल्या आहेत हे चित्र समोर आले, असे अजितदादा म्हणाले. ग्रामपंचायत निवडणूक ही निवडणुकांची रंगीत तालीम आहे.
— NCP (@NCPspeaks) September 20, 2022
पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही!
नैसर्गिक आपत्तीचे पैसे नुकसानग्रस्तांना मिळालेले नाही. अजून काही भागात मुसळधार पाऊस पडतोय. याबाबत सरकारने नवीन सूचना दिल्या पाहिजेत. एनडीआरएफचे निकषाप्रमाणे जास्तीचा पाऊस पडल्यानंतर जी काही मदत करायला हवी किंवा अधिवेशनामध्ये सरकारने जी काही मदत जाहीर केली होती. त्याअनुषंगाने पुढच्या मदती जाहीर केल्या पाहिजेत. परंतु त्या होत नाही ही शेतकऱ्यांची खंत आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.