मुंबई - घटनेच्या तरतुदीप्रमाणे मुख्यमंत्री निवड होते. परंतु नगराध्यक्ष निवडीबाबत राज्याला अधिकार दिलेत. मग मुख्यमंत्री जनतेतून निवडण्याबाबत अजितदादा जे बोलले, त्यांच्या बोलण्याचा अर्थ घटनेत बदल करा असा होता का? बोलण्याच्या ओघात माणूस बोलतो. कुणी कुणाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन निशाणा साधला, रिमोट कुणी चालवलं. अजित पवार आता बोलणार नाही. खासगीत बोलतील. तुमचं ऐकत होते म्हणून हे सगळं घडलं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जेव्हा नगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडतो तेव्हा जो ताकदवान असतो तो इतर पक्षातीलही नगरसेवक स्वत: सोबत घेऊ शकतो. त्यामुळे पारदर्शकता आणणं महत्त्वाचं. विरोधाला विरोध समजू शकतो. जेव्हा दिल्लीला आपले ३ नेते गेले. अजित पवार, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री गेले होते. तेव्हा भुजबळ मला म्हणाले होते चाललंय ते सगळं ओके आहे ना. अजित पवारांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. काय चाललंय कसं चाललंय. एकदम ओक्के होईल. जे काही घडलं का घडलं त्यावर भाष्य करत नाही. नितेश राणेंनी त्याचा थोडा उल्लेख केलाय असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
तसेच विधेयक मंजूर करा असं दादा बोलले म्हणजे त्यांना मला पुढे ऐकायचं नाही. जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. आम्ही कुठलंही काम बहुमताच्या जोरावर करणार नाही. आम्ही ठरवलंय. या विधेयकासाठी विधी न्याय विभागाची मान्यता घेतली आहे. भास्कर जाधवांनी नगरविकास खात्याबाबत सगळं सांगितले. जनतेतून सरपंच निवडावा ही मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली आहे. जनता बोलणार तेच आम्ही करणार असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंवर परत परत करूणा दाखवता येणार नाहीताट, वाटी चलो गुवाहाटी, बेंबींच्या देठापासून धनंजय मुंडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर ओरडत होते. असं वाटत होते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत. घसा खराब होईपर्यंत बोलले. तुमचा प्रवासही मला माहिती आहे. त्यावेळीस देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली. पण परत परत दाखवता येणार नाही. मी कमी बोलतो असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंडेंना टोला लगावला.