अजित पवार मुख्यमंत्री?; भाजपाच्या २ दिग्गज नेत्यांच्या विधानानं चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:15 AM2023-10-05T09:15:23+5:302023-10-05T09:16:06+5:30
राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ नंतर राज्यातील राजकारण अनपेक्षितपणे बदलले आहे.
मुंबई – अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून सातत्याने ते मुख्यमंत्री होतील असा दावा राष्ट्रवादी नेत्यांकडून केला जात आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला फुलस्टॉप दिला. परंतु आता भाजपाच्या २ दिग्गज नेत्यांनीच अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेत्यांनी केलेले हे विधान आगामी राजकीय हालचालींचे संकेत आहेत की बोलताना नेत्यांची चूक झाली हे येत्या काही काळात कळेलच.
राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ नंतर राज्यातील राजकारण अनपेक्षितपणे बदलले आहे. त्यात सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेत भाजपाला पाठिंबा दिला. त्यांच्या या भूमिकेला शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर अचानक एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली या घोषणेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर अलीकडेच सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांच्या भूमिकेने शरद पवारांच्या राजकारणाला हादरा बसला.
भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवर हे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यासाठी परदेश दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी मुनगंटीवार म्हणाले की, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा उभा करावा अशी सूचना मला मिळाली तेव्हा बिल्कुल हे केले पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी उभे राहील. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता आमच्यासोबत आलेले पुढचे मुख्य...उपमुख्यमंत्री अजित पवार असं त्यांनी म्हटलं. मुनगंटीवार यांनी पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असं म्हणता म्हणता स्वत:ला आवर घातला. चूक लक्षात येताच त्यांनी लगेच पुढचे उपमुख्यमंत्री असा अजित पवारांचा उल्लेख केला.
इतकेच नव्हे तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील अजित पवारांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केला. बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झालेत असं म्हटलं. त्यामुळे भाजपाच्या या २ दिग्गज नेत्यांनी केलेली विधाने ही राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असं राष्ट्रवादीचे नेते वारंवार म्हणत असतात. त्यात भाजपाच्या कोअर टीममधील या नेत्यांनी चुकून हे विधान केले की आगामी राजकीय घडामोडींचे हे संकेत समजावे का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.