वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:33 IST2025-01-14T17:32:11+5:302025-01-14T17:33:24+5:30
कोणीही दोषी असला तर सोडायचं नाही, ही आमची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले...
NCP Ajit Pawar: पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच खून प्रकरणातील संशयित वाल्मीक कराडवर आता मकोका कायद्यांतर्गतही कारवाई केली जाणार आहे. खंडणीच्या प्रकरणात कोर्टाने आज वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीने हत्या प्रकरणात त्याचा ताबा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारचा भूमिका स्पष्ट करत आम्ही कोणालाही सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. "आरोपी सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, त्रयस्थ असो किंवा त्याचा राजकारणाशी संबंध असेल तरी त्याला थारा दिला जाणार नाही," अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.
वाल्मीक कराडवरील कारवाईवर बोलताना अजित पवार म्हणाले की, "संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणीही दोषी असलं तरी हयगय न करता त्याच्यावर कारवाई करायची, हे पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी ठरवलेलं होतं. त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झाली आहे. महिना होऊन गेल्याने देशमुख यांच्या कुटुंबातील लोकही चिंतेत होते की या प्रकरणात काही कारवाई होणार आहे की नाही. मात्र पोलीस यंत्रणा त्यांचे काम करत आहे. सीआयडी आणि एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फतही या प्रकरणात चौकशी होणार आहे. कोणीही दोषी असला तर सोडायचं नाही, ही आमची भूमिका आहे. ही निर्घृण हत्या आहे आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी घटना कोणीही खपवून घेणार नाही. चौकशीत ज्याचे धागेदोरे सापडतील, त्या प्रत्येकावर कारवाई होईल," असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.
कराडला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार
न्यायालयीन कोठडीत गेलेल्या वाल्मीक कराडचा ताब्यात घेण्याची प्रक्रिया एसआयटीकडून तात्काळ सुरू करण्यात आली आहे. तसंच उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी कराडला पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती एसआयटीकडून कोर्टाकडे केली जाणार आहे. त्यामुळे आज खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मीकला उद्या मोक्का कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे.