Ajit Pawar: राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेची अंतर्गत धुसफूस बाहेर आली आणि एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. शिंदे यांच्या नेतृत्वाखील गटाने भाजपासोबत हातमिळवणी करून सत्तास्थापना केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेच्या आमदारांना महाविकास आघाडीत तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी सातत्याने केला. त्यानंतर आज, 'प्रत्येक पक्षाने तडजोडी केल्या आणि ज्यांचा पालकमंत्री त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना झुकते माप मिळाले', असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
"आमचं सरकार हे ३ पक्षांचे सरकार होतं. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये असताना तडजोडी आणि त्याग करावाच लागला. कोणीही पालकमंत्री असला तरी तो संपूर्ण जिल्ह्याचा पालकमंत्री असतो. त्यामुळे साऱ्या जिल्ह्याचा विचार केला जात होता हे खरं आहे. पण ज्या भागात ज्या पक्षाचा पालकमंत्री होता, त्या ठिकाणी त्या त्या पक्षाला झुकतं माप मिळत होतं. जिथे काँग्रेसचे पालकमंत्री होते तिथे काँग्रेसच्या लोकांचा झुकतं माप होतं. जिथे शिवसेनेचे पालकमंत्री होते, तेथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना झुकतं माप मिळत होतं. जेव्हा सरकारमध्ये विविध पक्ष असतात तेव्हा अशाप्रकारच्या तडजोडी करावेच लागतात", अशी कबुली अजित पवार यांनी दिली.
संजय राऊत सातत्याने सत्तांतराच्या गोष्टी करत आहेत. त्यावरही अजित पवार यांनी टीका केली. "आमच्या संपर्कात कुणी आमदार नाही. त्यामुळे मी कशाला उगाच काहीतरी सांगू. आमच्या संपर्कात कुणी आमदार आल्यानंतर मी त्याबद्दल काही सांगेन. आज माझं स्वत:चं मत आहे की, आजच्या घडीला एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सध्या राज्यात पूरपरिस्थिती गंभीर आहे तिथे मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यावं", असं त्यांनी सुनावलं.