राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या गुजराती निरमा पॉवडरने अजित पवार 'क्लिन' ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:32 PM2019-11-26T16:32:08+5:302019-11-26T16:33:30+5:30
खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. आता त्याच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. किंबहुना भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. मात्र अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा उद्देश साध्य झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने भाजपला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र बहुमत सिद्ध झाले नव्हते. राज्यपालांनी फडणवीसांना 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून भाजपला बहुमत सिद्ध कऱण्यास मदत करणार अशी शक्यता होती. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या भुमिकेमुळे भाजपच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरले गेले.
दरम्यान अजित पवार गटनेते म्हणून काही आमदार घेऊन भाजपसोबत गेले होते. मात्र ते आमदार पवारांच्या भूमिकेनंतर परत आले होते. तरी देखील भाजपला सरकार स्थापन्याचा विश्वास होता. त्यातच अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे असलेले आरोप आणि त्याची सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपच्या आरोपांमुळेच अजित पवार यांची चौकशी सुरू होती. ते अजित पवार भाजपमध्ये जाताच चौकशी बंद झाली होती.
चौकशी थांबल्याने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र भाजपमध्ये जाताच क्लिनचीट मिळते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. याआधी खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.