अहमदपूर - भारतीय न्याय संहितेमध्ये आता महिलांना अत्याचाराविरोधात घरबसल्या ई तक्रार नोंदवता येणार आहे. नवीन कायद्यात अशा प्रकरणी दोषींना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा आहे. तो कायमचा वर गेला पाहिजे. त्याच्या पुढच्या ५० पिढ्या आठवल्या पाहिजेत, ही विकृती आहे. नराधमांना माफी नाही. शाळा, रुग्णालये, पोलीस ठाणे तिथेही कुठल्या पातळीवर हयगय होणार नाही. आता कुणी हयगय केली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनाही जेलमध्ये चक्की पीसिंग, पीसिंग अँन्ड पीसिंग असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.
लातूरच्या अहमदपूर येथे जनसन्मान यात्रेवेळी अजित पवारांनीमहिला अत्याचारावर भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, महिला अत्याचारात निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का? या पद्धतीने वागता. बदनामी आमची होते. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असं आमच्या बहिणी सांगतायेत, काय तिचं चुकलं?. महिला अत्याचाराबाबत केंद्राने आणि राज्यानेही कायदे कठोर केले आहेत. या प्रकरणी कुणाचीही हयगय करायची नाही हे आम्ही ठरवलं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महिला, मुलींवर कुठे ना कुठे अत्याचार होतायेत. महिलांवरील अत्याचार अक्षम्य गुन्हा आहे. त्याला माफी नाही. दोषी कुणीही असू त्याला सोडणार नाही. सरकार येतील, सरकारे जातील पण महिला सुरक्षेबाबत कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य राहील. या नराधमांना फाशीवरच लटकवलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही 'माझी लाडकी बहीण योजना' आणली. या योजनेच्या माध्यमातून माझ्या बहिणींच्या बँक खात्यात प्रतिमहिना पंधराशे रुपये जमा करण्यास सुरुवात केली. या योजनेला बहिणींनी सुद्धा भरघोस प्रतिसाद दिला. तरुणांना प्रशिक्षण भत्ता देत आहोत. गोरगरिबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देत आहोत. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे. याशिवाय मधल्या काळात आम्ही कोतवालाचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, अंगणवाडीचं मानधन वाढवलं. याप्रमाणे आम्ही निर्णय घेत राहू. महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रवासीयांना विकास पथावर पुढे नेण्यासाठी महायुती सरकारनं अनेक अभिनव योजना हाती घेतल्या आहेत. या योजना दीर्घकाळ सुरूच राहाव्यात, यासाठी तुम्हा सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हवा आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या, विकास आम्ही घडवून आणू, हा माझा शब्द आहे असंही आवाहन अजित पवारांनी महिलांना केले.