कुणी काय मागावं हा ज्याचा त्याचा अधिकार- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:16 PM2020-01-01T16:16:48+5:302020-01-01T16:17:03+5:30
ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर झालेला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे.
मुंबई- ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर झालेला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. परंतु कोणतं खात कोणत्या मंत्र्याला द्यायचं यावर अद्यापही महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत होत नाहीये. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं असून, त्यांना वित्त खातं मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक झाली, असं मी ऐकलं.
संबंधित एखादं खातं मिळावं अशा मागणीसाठी बैठक झाल्याचं समजलं. परंतु जो खात्याचा प्रमुख असतो, त्यांचा अधिकार असतो कोणाला कोणतं खातं द्यावं. कुणी काय मागावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत. तीन पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या आघाडीचं हे सरकार आहे. कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं, यासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील.
नवीन वर्षात खातेवाटप व्हावं आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काम सुरू करावं, अशी जनतेची इच्छा आहे. बाकीचे 36 जण हे बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिल्यास ते आपापली जबाबदारी पार पाडतील. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोणाला कोणतं खातं द्यावं याची यादी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. खातेवाटप जाहीर करणं आता त्यांच्याच हातात आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.