अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:46 PM2024-09-04T17:46:45+5:302024-09-04T17:47:25+5:30
अजित पवार तुमच्यासोबत आल्याने तुमचे नुकसान झाले का, असा प्रश्न रावसाहेब दानवेंना विचारण्यात आला होता.
लोकसभेला अजित पवार गटामुळे महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला नुकसान झाल्याची टीका केली जात आहे. यामुळे महायुतीत लोकसभेचा निकाल लागल्यापासूनच फटाके फुटू लागले आहेत. अनेकदा भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अजित पवार सोबत नको अशी उघड भूमिका घेतलेली आहे. असे असताना अजित पवार सोबत आल्याने नुकसान झाले का या प्रश्नावर माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार तुमच्यासोबत आल्याने तुमचे नुकसान झाले का, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. यावर मी त्यांना उत्तर दिले की, अजित पवार आमच्यासोबत आल्याने आमचे नुकसान झालेले नाही. पण 2019 ला विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजित पवार विरोधकांसोबत गेल्याने आमचे नुकसान झाल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
२०१९ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढली. लोक आम्हाला बोलले की, तुम्ही पुन्हा एकदा सरकार बनवा. बाळासाहोब ठाकरेंनी कधीही काँग्रेसशी युती केली नाही. सत्तेच्या लालचेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळे आमचे सरकार बनू शकले नाही आणि आमचे नुकसान झाले असे दानवे म्हणाले.
याचबरोबर यावेळी अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला, त्यामुळे आमचे नुकसान झाल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही दानवेंनी अजित पवारांवर टीका केलेली आहे. पहाटेची शपथ घेऊन अजित पवार यांनीच स्वार्थीपणा केला. आमच्यासोबत गणिते जुळली नाहीत म्हणून पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली, अशी टीका २०२३ मध्ये दानवेंनी केली होती.