Ajit Pawar vs BJP, Chatrapati Sambhaji Maharaj: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत केलेल्या एका विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सुनावलेच. पण त्यासोबत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही अजित पवारांना चांगलात टोला लगावला.
अजितदादांना बावनकुळेंचं सणसणीत उत्तर
विधानसभेत बोलताना, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. यावरून टीका करताना बावनकुळे म्हणाले, "अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते? होय धर्मवीरच! छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. “धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये!"
--
याच मुद्द्यावरून, भाजपा आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेतला. "अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असं बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा. अजित पवार यांचे १४ मे २०१९ चे ट्विट भोसले यांनी दाखवले. अजित पवार २०१९ पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र आता २०२२ मध्ये कशी त्यांना उपरती आली?", असा सवाल या आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केला.