Ajit Pawar vs BJP: महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन नुकतंच नागपूरात पार पडलं. या अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले, "आपण छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते." अजित पवारांच्या या विधानावर भाजपाने सडकून टीका केली.
"अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असं बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा. अजित पवार यांचे १४ मे २०१९ चे ट्विट भोसले यांनी दाखवले. अजित पवार २०१९ पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र आता २०२२ मध्ये कशी त्यांना उपरती आली?", असा सवाल भोसले यांनी केला. "स्वार्थासाठी सर्व ठिकाणी सेटलमेंट करणाऱ्यांना धर्मासाठी त्याग काय असतो ते काय कळणार? 'धरणवीर' असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये," असे अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावले. तसेच भाजपाने अजित पवारांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपालाच कोंडीत पकडण्यारा एक सवाल केला आहे.
"गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे की नाही हे भाजपeने पहिल्यांदा सांगावे आणि मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का हेदेखील सांगावे," असा कोंडीत पकडणारा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. "विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपने पुकारलेले आंदोलन एकदम चुकीचे आहे. भाजपला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहासच माहिती नाही. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते. त्यांनी १२०पेक्षा जास्त लढाया लढल्या व जिंकल्या त्या स्वराज्यासाठीच होत्या," असेही तपासे म्हणाले.
"गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे का? राज्यपाल, भाजपाचे प्रवक्ते, मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली त्याचा निषेध विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. आज भाजपा जे आंदोलन करत आहे, ते दुटप्पी आहे आणि अजित पवार यांना जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी आहे," असा आरोपही त्यांनी केला.