Ajit Pawar सुप्रिया सुळेंनी डिवचताच अजित पवारांनी केला पलटवार; बारामतीकरांसमोर काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:25 PM2024-09-02T16:25:51+5:302024-09-02T16:26:21+5:30
Ajit Pawar Supriya Sule : सकाळी लवकर उठण्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना चिमटे काढले. त्याला अजित पवारांनी उत्तर दिले.
Baramati Ajit Pawar Supriya Sule : 'मी सकाळी लवकर उठतो, हा काही लोकांचा डॉयलॉग माझ्यामुळे बंद झाला", असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना डिवचले. सुप्रिया सुळेंच्या टीकेला अजित पवारांनीबारामतीतून उत्तर दिले. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी बारामतीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
अजित पवार म्हणाले, "वैयक्तिक स्वरुपाची टीका टिप्पणी... तो काय म्हणाला, त्यावर मी काय बोलणार? मग मी मत व्यक्त करणार. यात वेळ वाया घालवू नका. केवळ राजकीय स्वरुपाच्या टीका टिप्पणी टाळून विकासावरच बोलायचे असे मी ठरवले आहे. जसे मी ठरवले आहे, तसे कार्यकर्त्यांनी ठरवायचे आहे.
अजित पवारांनी हात जोडून केली विनंती, कार्यकर्त्यांना काय म्हणाले?
"इतरजण काही काही बोलत आहेत. बोलू द्या. आपल्या अंगाला भोकं पडत नाही. काहीजण सांगतात सकाळी कोण उठा म्हणते? आम्ही कुठे म्हटले की तुम्ही उठा म्हणताहेत. कोण म्हणतो दुधवालाही सकाळी उठतो. उठतो ना, मी कधी म्हटले की दूधवाला दुपारी उठतो. मी म्हटलोच नाही. या गोष्टीला महत्त्व देऊ नका. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे", असे आवाहन अजित पवारांनी केले.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
"कोणी कुणावर उपकार करत नाही. हे सांगतात आम्ही दिवसरात्र काम करतो. आम्ही तुम्हाला आग्रह केला होता का? तुम्हाला हौस आहे आमदार आणि मंत्री व्हायची; त्यामुळे काम करा. आमच्यावर उपकार करता का?", असे सुप्रिया सुळे म्हणालेल्या.
पुढे त्या म्हणाल्या होत्या की, "ही विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. कष्ट सगळेच करतात. लोकांचा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो. मी म्हणाले दूधवाला पण लवकर उठतो. दूधवाला ४ वाजता उठतो, मग गावात भाषण करून सांगता का, मी लवकर उठतो. तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे माझा नाही. तिला चहा करावा लागतो", अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली होती.