पुणे : 65 हजार कोटी खर्च होऊन राज्यात सिंचन टक्केवारी वाढलेली नाही. जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा आम्हाला सवाल विचारण्यात आले. आता मात्र सरकार आकड्यांचा खेळ करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला.
पवार यांनी गुरुवारी शहरातील मानाच्या आणि इतर मंडळांना भेटी दिल्या. दिवसभरात त्यांनी सुमारे २० मंडळांना भेटी दिल्या असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, वित्त आयोग येण्यापूर्वी राज्याची आर्थिक स्थिती विदारक आहे असं सांगितलं जात होत. आता मात्र उलट बातम्या आल्या असून हा घोळ तपासण्याची गरज आहे. आम्ही यात माहितीचा अधिकार वापरणार असून सत्य समोर आणू. सध्या पोकळ आकडेवारी ,नोटबंदी ,इंधन दरवाढ, महागाई यामुळं जनता कंटाळली आहे.
लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना केलेल्या धक्काबुक्की प्रकरणीही त्यांनी आपले मत मांडले आहे. अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा पोलिसांना धक्काबुकी होणं योग्य नाही अशा शब्दात त्यांनी पोलसांची पाठराखण केली. गणेशोत्सवात डी जे डॉल्बीबाबत स्पष्ट धोरण असावे. डी जे धोरण तयार करताना सर्व धर्मांकरिता समान फुटपट्टी लावावी. भेदभाव होऊ नये असेही ते म्हणाले.