नाना, तू किती पक्ष फिरून आलाय माहितीय, मला कशाला शिकवतोय; अजित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:11 PM2024-01-18T17:11:26+5:302024-01-18T17:11:58+5:30
आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे कारण नाही असं अजित पवार नाना पटोलेंना म्हणाले.
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील शाब्दिक संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. नाना पटोलेंनी केलेल्या टीकेवर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. नानाला म्हणावं, तू किती पक्ष फिरून आला हे आम्हाला माहिती आहे. तू मला कशाला शिकवतो असा टोला त्यांना नाना पटोलेंना लगावला. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला निर्धार मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवारांनी मोदींनाही त्यांचे वय झालंय असं बोलावे अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले की, वय आपल्या सगळ्यांचे होणार आहे. परंतु ज्यावेळी होईल तेव्हा विचारू ना. ८० च्या पुढे गेल्यावर विचारू. आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे कारण नाही. नाना, तू किती पक्ष फिरून आलाय आम्हाला माहिती आहे. तू कशाला आम्हाला शिकवतो असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत मराठा आरक्षणाबाबत सरकार सरकारचं काम करतंय, कायद्याच्या नियमांच्या चौकटीत ते आरक्षण बसले पाहिजे. न्यायालयात जे आरक्षण नाकारले गेले तसे पुन्हा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री स्तरापासून सगळेच काळजी घेतायेत. मुख्यमंत्री त्या विषयात तज्ज्ञांशी बोलतायेत. महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या प्रश्नावर ते दावोसला असले तरी त्यांच्यासोबत चर्चा होत आहे असं अजित पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईच्या आंदोलनावर बोलले.
दरम्यान, आम्ही ज्या गाडीत बसलो, त्यात दाटीवाटीनं बसलो असा व्हिडिओ व्हायरल केला ते मुर्ख लोक आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात प्रत्येक गाडीत कुणी बसायचे हे सगळे ठरलेले असते. आमचे सहकारी गिरीश महाजन यांना गाडी राहिली नाही. ताफा निघून गेला. त्यामुळे मी त्यांना गाडीत बसायलं सांगितले. आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाही. सगळ्यांना पुढे घेऊन जाणारी माणसं आहोत. त्यामुळे अशा गोष्टींना फार महत्त्व देण्याची गरज नाही. जर आम्ही दोघेच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही घेत नाही असं झाले नाही. दुर्दैवाने जे असे व्हिडिओ व्हायरल करतंय त्यांची कीव येते. विकासाबाबत बोलावे. जे गाडीत बसलेत त्यांना त्रास नाही पण या लोकांना त्रास व्हायला लागलं आहे असं प्रत्युत्तर अजितदादांनी विरोधकांना दिले.
काय म्हणाले होते नाना पटोले?
नाना पटोले म्हणाले होते की, वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो असं त्यांनी म्हटलं होते.