नाशिक - माझी बदनामी करणं, सातत्याने गैरसमज निर्माण करणं असा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. ज्यांनी कुठलाही पुरावा नसताना संसदेपासून इथपर्यंत माझ्यावर वेश बदलून प्रवास केल्याचे आरोप केलेत. त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत. जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन असं मोठं विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिक इथं पत्रकारांशी अजित पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, मी गेले ५-६ दिवस माध्यमांत बघतोय, पेपर वाचतोय, राजकीय लोकांनीही विधानं केलीत. अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. हे सर्व धादांत खोटे आहे. हे बदनामी करण्याचं काम सुरू आहे. माझ्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. आरोप करण्याआधी माहिती घ्या. मी ३५ वर्ष काही काळ विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि मंत्री, आमदार म्हणून जबाबदारी मलाही कळते. नाव बदलून प्रवास करणं हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. खुशाल कुणी बहुरुपी म्हणतंय आणखी कुणी काही म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाजलज्जा शरम वाटली पाहिजे. धादांत बिनबुडाचे आरोप केले जातायेत त्यात काहीही सत्य नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
त्याचसोबत सकाळी ९ वाजता भोंगा लागतो, अजित पवारांनी असं केले वैगेरे, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्हाला कुठे पुरावा मिळाला, नाव बदलले, मी कुठेही गेलो तरी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो. मी टोपी घातली होती, मिशा लावल्या होत्या, मास्क घातला होता. साफ चुकीचे आहे. जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन. जर नाही सिद्ध झालं तर ज्या लोकांनी संसदेपासून इथपर्यंत जी नौटंकी लावली त्यांना थोडी जनाची नाही तरी मनाची वाटायला हवी होती. कुणीतरी चॅनेलवर बातमी लावते, त्या बातमीचा कुठे पुरावा नाही, त्याला आधार नाही. कॅमेऱ्यात काही व्हिडिओ नाहीत. माझी बदनामी करण्यासाठी हे सुरू आहे असं सांगत अजित पवारांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, आम्ही विकासाच्या गोष्टी बोलतोय, महिला, युवकांसाठी योजना आणतोय. मी शब्दाचा पक्का आहे. या योजना यापुढेही सुरु राहतील. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा यावर आम्ही काम करतोय. मागे वित्त विभागाबाबत बातमी छापून आली. मी गप्प बसलो, मात्र गप्प बसलो तर जे विरोधक सांगतायेत ते खरे आहे असं वाटेल. मध्यंतरी पेपरबाजी चालली, कुणीही उठतं आणि बोलतं, मला कुठल्या विमानात बघितलं, १० वेळा गेलो, याला भेटलो, त्याला भेटल्या. मी लोकशाहीत काम करणारा आहे. मला कुठे जायचे तर उघडपणे जाईन. मी लपून छपून राजकारण करणारा नाही. मी खरे स्पष्ट असेल ते बोलतो. माझ्याबाबत वेगळ्या बातम्या आणायच्या, ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय हे बघवत नाही. ते फेक नरेटिव्ह सेट करून वेगळा प्रयत्न करत असतात. माझ्याबाबत ज्या बातम्या आल्या त्यात तसूभरही सत्य नाही.माझं संसदेला आव्हान आहे, ते खरे असेल तर अजित पवार राजकारणातून बाजूला जाईन. ज्यांनी संसदेत कुठलाही पुरावा नसताना, काही खरे नसताना आरोप केले त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं असं आव्हानच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना दिलं.