...अन् डोकं गरगर गरगर करतात, अजितदादांनी ऐकवला किस्सा अन् सभागृहात पिकला हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 09:43 PM2024-01-29T21:43:13+5:302024-01-29T21:44:42+5:30
अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी अजित पवारांची दिलखुलास मुलाखत घेतली
पुणे - टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हात लागतात. काही काहीजण रोज सकाळी ९-१० वाजले तर त्यांचा भोंगा वाजतोच. ते बोलताना कधीही चांगले झाले तरी पाठिंबा देत नसतात. चांगले झालं तरी त्यातलं कुणाच्या मनात नसताना एखादे वाईट काय ते शोधण्याचं काम करायचे. त्यातून त्याचं डोकं गरगर गरगर करतात असले प्रकार आहेत. मी अलीकडे फार वेडवाकडे शब्द कुठेच वापरत नाही. मी बारा पंधरा वर्षी एकदाच वापरला त्यानंतर जी माझी...असं बोलत अजित पवार थांबले आणि त्यानंतर मी आत्मक्लेश केला असा किस्सा अजितदादा बोलले आणि सभागृहात हशा पिकला. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर निशाणा साधला.
अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी अजित पवारांची दिलखुलास मुलाखत घेतली त्यात अजित पवार म्हणाले की, आपण राजकीय क्षेत्र निवडले असले, जरी ग्रामीण भागातील शब्द आपल्याला माहिती आहे. परंतु ग्रामीण भाग आणि शहरी भाग आता ५० टक्के झालाय. सुशिक्षित पिढी आहे. त्यांना हे शब्द एवढे खटकतात. म्हणून तो शब्द बाहेरच पडून द्यायचा नाही हे मी ठरवलं. मी जेव्हा जेव्हा चूक झाली ती उघडपणे मान्य केली. जो माणूस काम करतो तो चुकतो, जो काम करत नाही तो चुकणार कसा. आपल्याला ज्या सवयी आहेत त्या बदलता येत नाही. आम्ही ज्या वातावरणात लहानाचे मोठे झालो तेव्हा मीडिया, सोशल मीडिया, मोबाईल वैगेरे नव्हते. आता याचा फायदा घेऊन अनेकजण काम करतात. मी जरा कार्यक्रम रद्द केले लगेच अजित पवार नॉट रिचेबल अशी बातमी चालवली असं सांगत अजित पवारांनी माध्यमांना खोचक टोला लगावला.
काळानुरुप भूमिका घेतली पाहिजे
अनेक कार्यकर्तेही जनाधार कुठे आहे, आपल्याला काय पाहायला मिळते, कुठे राहिल्यावर पद मिळेल, आपली कामे मार्गी लागतील हे पाहतो. माणसाचा हा स्वभाव आहे. तह करताना छत्रपतींनी कधी दोन पावले मागे घेतली असतील परंतु आक्रमकपणा सोडला नाही. इतिहासात ते घडले आहे. आज यूएसएमध्ये जे आहेत ते पुन्हा निवडून येतील ती शक्यता कमी आहे. आपल्या देशात एकसंघ ठेवण्याच्या दृष्टीने पुरोगामी विचारधारा हीदेखील महत्त्वाची आहे. आम्ही पुरोगामी विचारधारा सोडली नाही. राजकीय जीवनात काम करताना त्या त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतलेत. नीतीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनीही अनेकदा स्पष्ट सांगितले आमचा पुरोगामी पक्ष आहे. आताच्या काळात काळानुरुप भूमिका घेतली पाहिजे. आपल्या राज्याचा विकास व्हावा, देशात पहिल्या क्रमाकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक टिकावा. सगळ्यांना गुण्यागोविंदाने राहता यावे. कुठल्याही घटकाला अस्वस्थ वाटू नये असं अजित पवारांनी सांगितले.
टाटा कंपनीचं अजित पवारांनी केलं कौतुक
लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांच्या पक्षातील काही आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून राज्याचा प्रमुख म्हणून नीतीश कुमारांना कुणकुण लागली. ती लागल्यानंतर मी मनाचा मोठेपणा दाखवला, या लोकांना सत्तेत आणले, मंत्रिपदे दिली. त्यातून नाराजी वाढली. त्यामुळे नीतीश कुमारांना ही भूमिका घ्यावी लागली. राजकारणात सर्वसामान्य माणसांना आत काय घडतंय हे माहिती नाही. टीव्ही चॅनेलच्या संपादकांना किती अधिकार आहेत आणि मालकांना किती ऐकावे लागते हा विचार करण्यासारखा आहे. कोण उघडपणे बोलणार नाही. प्रत्येकाला आपापले काम सुरू ठेवायचे आहे. त्यामुळे दबक्या आवाजात काय करायचे ते करत असतात. फक्त राजकीय लोकांबाबतीत असं घडतं तर नाही. उद्योगाच्या बाबतीत असे आहे. सरकार बदललं तर आता राज्यकर्त्यांच्या जवळ असलेले उद्योगपती सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतात. कारण त्यांना त्यांची इंडस्ट्री चालवायची आहे. यात फक्त आजपर्यंत जास्त कुणी नागरीक बोलू शकत नाही ती टाटा कंपनी..टाटा कंपनीने पहिल्यापासून त्यांची प्रतिमा सांभाळली आहे. ते आता आले आणि १०-१५ वर्षात टॉपला गेले असं त्यांच्या बाबतीत घडलं नाही. काहींच्या बाबतीत ते घडले. त्यात त्यांचे कष्ट असू शकते, डोके असू शकते, शेअर्सच्या बाबतीत वर खाली होत असते असं सांगत अजित पवारांनी टाटा कंपनीचेही कौतुक केले.
देशाला नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
काँग्रेसचं सरकार होते, जुन्या लोकांना माहिती असेल, १९५७ साली शेतकरी कामगार पक्ष खूप मजबूत होता, विचारधारा, भाषणे जबरदस्त होती. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितली, तुम्ही इतकं सगळं करून विरोधात राहताय, मग काँग्रेसमध्ये या, तुम्हीच काम करा आणि निर्णय घ्या असं करून शेकाप आता थोडा रायगडमध्ये राहिला, सांगोल्यात राहिला आणि आता फार संख्येने कमी राहिला. प्रत्येकाने त्या त्या काळात बेरजेचे राजकारण केले आहे. आताच्या काळात आम्ही राज्यात १४४ आमदार निवडून आणू शकत नाही. आम्हाला राज्यात कारभारदेखील करायचाय. आज देशात नेतृ्त्वाकडे नजर टाकली तर नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. मग त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे व्हिजन, कामाची पद्धत पाहिली, मेहनत, कष्ट एवढ्या मोठ्या देशाचा कारभार सांभाळणे, लेचापेचा निर्णय न घेणे यामध्ये प्रत्येकाच्या मनात त्रास होतो, टेन्शन असते, दबाव असतो. त्यांनी स्वीकारले आहे. ते काम करतात. बाकीचे भांडत बसतात असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितले.
दरम्यान तपास यंत्रणांचे काम तपास करणे हे आहे. मधल्या काळात महाआघाडीचे सरकार होते, तेव्हा गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला नाही का...? जर माहिती काही मिळाली तर तपास केला तर गोष्ट वेगळी आहे. या स्वायत्त संस्था आहे त्यांच्याकडे माहिती मिळाली तपास केला जातो. आता बोभाटा जास्त होतो. आता माझ्याकडे जीएसटी विभाग आहे. जीएसटी चुकवलेल्यावर धाड टाकायचा अधिकार आहे. पण उद्या जर कुणी धाड टाकली तर माझ्या नावाने बघा अजित पवारांनी धाड टाकायला सांगितली असे बोलले जाते असंही त्यांनी विरोधकांवर भाष्य केले.