पुणे - अलीकडेच एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी भावनिक होत व्यासपीठावरच शरद पवारांसमोर अजित पवारांची तक्रार केली, अजित पवार हे विरोधी पक्षनेते असतानाही माझ्यावर ज्यांनी खालच्या शब्दात टीका केली तो मुद्दा सभागृहात उचलला नाही असं म्हटलं. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुषमा अंधारेंना खोचक टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणाले की, सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत, ठाकरे गटात आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे आहेत. पवारांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघतायेत, काकारे, मामारे करत ज्या पक्षासाठी भाषण करता, त्यांच्या उद्धव ठाकरेंना सांगा, उद्धव ठाकरेंसमोर रडला असता आणि अंबादास दानवेंना मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता तर योग्य ठरले असते. विधानसभा विरोधी पक्षनेत्याप्रमाणे विधान परिषदेच्या पक्षनेत्यालाही अधिकार आहे अशा शब्दात त्यांनी फटकारले आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?साताऱ्यातील कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर भाषण केले, त्या म्हणाल्या की, इथे राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणे गरजेचे आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता अशी तक्रार सुषमा अंधारे यांनी केली.
अजित पवारांची राज्यपालांच्या भूमिकेवर शंकाराज्यपाल हे महत्त्वाचे पद आहे. जो व्यक्ती या पदावर बसतो त्याने पूर्वीची पार्श्वभूमी कुठल्या पक्षाची होती हे विचार न करता निष्पक्षपणे काम करायला हवे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यात राज्यपालांबाबत ही घटना घडते. यूपीए, काँग्रेसच्या काळातही अनेकदा हे घडले आहे. आताही तेच घडतेय असं अजित पवार म्हणाले.
त्याचसोबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाने सगळ्यांना जो काही धडा मिळायला हवा तो मिळाला आहे. यापुढे असा प्रसंग कधी होऊ नये हे पाहायला हवे. जर असा प्रसंग आला तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले पाहिजे हे कळाले. सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांनी मिळून निकाल दिला आहे. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा असं कोर्टाने म्हटलं, जुलैमध्ये अधिवेशनात जी भूमिका घ्यायला हवी ती घेऊ असं अजित पवारांनी स्पष्ट केले.