Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:28 PM2024-10-30T14:28:12+5:302024-10-30T14:33:17+5:30
Ajit Pawar Latest News: राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांकडून या प्रकरणाचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. या प्रकरणावरून अजित पवार सुप्रिया सुळेंवर भडकले.
Ajit Pawar Supriya Sule News: बारामती विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रभर चर्चेत आहे. प्रचाराचा नारळ फोडल्यापासूनच शरद पवार विरुद्ध अजित पवार हा राजकीय संघर्ष वाढला आहे. राष्ट्रवादीच्या खटल्याचा उल्लेख करत शरद पवारांनी अजित पवारांमुळे कोर्टाची पायरी चढावी लागली, असे म्हटले. तर मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा करावा लागला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या दोन्ही विधानांबद्दल अजित पवारांनी रोखठोक भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले की, आजपर्यंत कधीही कोर्टाची पायरी चढली नव्हती. तुमच्यामुळे त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
"आम्ही त्याच पद्धतीने केलं, काय चूक केली?"
अजित पवार म्हणाले, "अजिबात नाही. सगळी संघटना बहुमताने आली. निवडणूक आयोगाने निर्णय दिला. तुम्ही एकिकडे काय म्हणता जनतेच्या दारात जा. तुम्ही म्हणता न्याय व्यवस्थेकडे जा, न्याय व्यवस्था जो निर्णय देईल, मान्य करा. निवडणूक आयोग जो निर्णय देईल, ते मान्य करा. त्याच पद्धतीने आम्ही गेलो, आम्ही काय चूक केली?", असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला.
ते पुढे म्हणाले, "न्यायालयात प्रकरण सुरू आहे. तिथे आपण जाऊन काय करणार आहे? कोर्टात तुमच्या वतीने वकील भांडणार. माझ्यावतीने वकील भांडणार. आपण नुसते. वकील काय बोलतो ते बघतो. मग सहानुभूतीसाठी तुम्ही कोर्टात गेला का?", असा उलट प्रश्न अजित पवारांनी शरद पवारांना केला.
सुप्रिया सुळेंना सुनावलं, लेकी कोर्टातील वाढदिवसाबद्दल अजित पवार काय बोलले?
"सुप्रिया पण नेहमी सांगते, माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि मला कोर्टात जावं लागलं. अग मग वाढदिवस करायचा, कशाला कोर्टात गेली? त्या दिवशी, एका तारखेला नसती कोर्टात गेली, तर चाललं असतं. वकिलाला सांगायचं की, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. पुढची तारीख माग. पुढची तारीख मागता येते ना?"असा सवाल करत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची कोंडी केली.
"हे जे आहे ना भावनिक करायचं, हे बरोबर नाहीये हो. रेवती माझीच मुलगी असल्यासारखी आहे. पण, माझ्या मुलीचा वाढदिवस होता. मी कोर्टात गेले. मी तिथे बसले. तिथे तिला यायला सांगितलं. असं नका ना करू? ठीक आहे. माझी वेगळी मते आहेत. तुमची वेगळी मते आहेत. पण, या पद्धतीने... मी कुणालाच कोर्टात जायला सांगितलं नाही. मी कोर्टाची पायरी अजूनपर्यंत चढलो नाही. मी दिल्लीत गेलेलो बघितलं का? आम्ही वकिलांना पैसे देतो, तेही पैसे देतात; वकिलांनी त्यांची बाजू मांडली पाहिजे", असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंकडून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले.