मुंबई- औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादावादीनंतर उसळलेल्या दंगलीवरून सरकारवर सर्वस्तरातून टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसंच पोलीस प्रशासनालाही यासाठी तितकंच जबाबदार धरलं आहे. औरंगाबादमधील हिंसा हे सरकारचं पूर्ण अपयश असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.हिंसेच्या वेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी सतर्क राहायला हवं होतं, असं अजित पवार म्हणाले. तसंत औरंगाबादमधील प्रकारासाठी अजित पवार यांनी गृहखातं सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. कडक कारवाई करण्यात मुख्यमंत्री कमी पडत आहेत. दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जावी,अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, औरंगाबादमधील हिंसाचारावरून सामना संपादकीयमधूनही सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. औरंगाबादमधील हिंसाचार म्हणजे राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा पुरावा असल्याची टीका सामनातून करण्यात आली. किरकोळ कारणावरून दंगल भडकते व त्यातून कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. ही कारणं पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीका केली. शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठ्या संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे. ‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाहीअसा पण मुख्यमंत्र्यांनी केला आहे काय?'', असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.