Ajit Pawar Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात नुकताच एक मोठा भूकंप झाला. सुरूवातीला राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. या बंडखोरीला शिवसेनेच्या इतर आमदारांचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे सुमारे ५० आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात सत्तास्थापना केली. असाच एक बंडखोरीचा प्रयत्न २०१९ मध्ये झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तास्थापना केली होती. याच संदर्भातील एका गोष्टीबाबतचा खुलासा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.
हल्ली अनेक नवनवीन शो मराठी वाहिनींवर येत असतात. झीमराठीवर आता ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चा रंगल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमाचा एक छोटासा टिजर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अभिनेता सुबोध याने ट्वीट केला. त्यात खासदार सुप्रिया सुळे या पाहुण्या म्हणून उपस्थित असल्याचे दिसले. यावेळी तेथे हजर असलेल्या काही महिलांनी सुप्रिया सुळे यांना काही प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता की, जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शपथ घेतली, त्यावेळी तुमच्या घरातील वातावरण कसे होते? त्यावर सुप्रिया सुळे यांनी अतिशय मजेशीर पणे उत्तर दिले की, त्यावेळी मी झोपेत होते. पाहा तो धमाल व्हिडीओ-
दरम्यान, २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी पहाटे भाजपा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट यांनी मिळून सरकार स्थापन केले होते. या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी जेव्हा शपथ घेतली त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. या स्टेटसमध्ये त्यांनी अतिशय भावनिक मेसेज लिहिला होता. सुरूवातीला "पक्षात आणि कुटुंबाच फूट", असा एक स्टेटस ठेवला होता. तर दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिले होते, "तुम्ही आयुष्यात कोणावर विश्वास ठेवता... आयुष्यात माझी इतकी फसवणूक कधीही झाली नव्हती... त्यांची (अजितदादा) बाजू घेतली, त्यांच्यावर प्रेम केलं.. पण त्या बदल्यात काय मिळालं पाहा", असे सुप्रिया सुळे यांनी लिहिले होते. असे असताना अजित दादा दीड दिवसांतच फडणवीसांच्या सरकारमध्ये राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडे आले होते. त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री होते.