दादा रक्षाबंधनाला आला नाही, दिवाळीला तरी येणार का? सुप्रियांनी बारामतीतील देवीच्या मंदिराबाहेरून सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:49 PM2023-10-20T12:49:01+5:302023-10-20T12:49:56+5:30
अजित पवार आणि कुटुंबीय आता दिवाळीला तरी शरद पवारांच्या घरी एकत्र दिवाळी साजरी करण्यासाठी येतात का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
राष्ट्रवादीमध्ये कधी नव्हे ती उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदेंसारखेच बंड करत अजित पवारांना काकांवर आरोप करत सत्तेची वाट धरली आहे. यामुळे पवार कुटुंबातही मोठी फूट दिसली आहे. रक्षा बंधनाला अजित पवार गेले नाहीत. यामुळे दिवाळीला, भाऊबीजेला तरी अजित पवार येणार का, असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना हा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या बारामतीत शहरातील माळावरच्या देवीच्या दर्शनाला आल्या होत्या. शारदाबाई पवार आणि प्रतिभा पवार या नवरात्र उत्सव करतात. आपल्या आई आणि आजीची आस्था असल्याने मी दर्शनाला आले असे त्या म्हणाल्या.
पवार कुटुंबीय या दिवाळीला एकत्र येणार का असा सवाल त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी बारामतीतील गोविंग बाग हे पवार कुटुंबीयांचे घर सर्व जनतेचे आहे. जेवढा आपला हक्क आहे, तेवढाच जनतेचाही आहे. तुम्ही कधीही गोविंद बागेत येऊ शकता. पवारांची दिवाळी कालही एकत्रित होती, आजही एकत्रित आहे आणि उद्याही एकत्रित राहील. राजकीय मतभेद जरूर झालेले आहेत. राजकीय मतभेद वेगळे असतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मी भारतीय संस्कृती मानणारी आहे. जेव्हा राजकीय लढाई असेल तर ती पूर्ण ताकदीने लढली जाईल. जेव्हा कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या असतील तर जबाबदारीने पार पाडेन असेही सुळे यांनी म्हटले आहे.
अजित पवार आणि कुटुंबीय आता दिवाळीला तरी शरद पवारांच्या घरी एकत्र दिवाळी साजरी करण्यासाठी येतात का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. शरद पवारांनी अजित पवारांची पुन्हा घर वापसी नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे राजकीय संबंध संपले परंतू, कौटुंबीक तरी उरलेत का हे महाराष्ट्राला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजणार आहे.