राष्ट्रवादी पक्ष फुटला हे सर्वांनाच आता माहिती झाले आहे. परंतू, त्याचे तडे आता पवार कुटुंबाला गेले आहेत का, हे सांगणारा आजचा दिवस आहे. अजित पवारांनी वेगळी वाट पकडल्यानंतरचे बहीण भावासाठीचे हे पहिलेच रक्षाबंधन आहे. परंतू, दरवर्षी सकाळी सकाळी होणारा राखी बांधण्याचा पवार कुटुंबातील कार्यक्रमच झाला नसल्याचे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे.
सकाळी कुठेनाकुठेतरी आमच्या आधीच्या पीढीच्या बाबतीतला नेहमी, दरवर्षी राखी बांधण्याचा कार्यक्रम होत होता, तो झाला असता आम्हाला आनंद वाटला असता, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. याचबरोबर रोहित पवारांनी आशावादी असल्याचेही म्हटले आहे.
आजचा दिवस संपलेला नाहीय. अजून संध्याकाळची देखील वेळ आहे. व्यक्तीगत जीवन, कौटुंबीक नाती आणि राजकारण हे कुठेतरी वेगळे राहिले पाहिजे. संध्याकाळपर्यंत बघू काय होतेय, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. अजित पवार रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जातात का? दरवर्षीप्रमाणे सकाळी का नाही गेले? पक्षासोबतच पवार फॅमिलीतही फूट पडलीय का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
शिवाय अजित पवारांशिवाय पवार कुटुंबाने राखी बांधण्याचा कार्यक्रम टाळला का, असाही सवाल कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. अजित पवारांनी जेव्हा भाजपासोबत जाण्याची भुमिका घेतली तेव्हा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे त्यांचे मोठे भाऊ म्हणूनच राहणार असे म्हटले होते.