अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:14 AM2024-03-18T10:14:59+5:302024-03-18T10:15:20+5:30
Shrinivas Pawar Speech Baramati: तो विचार मला वेदना देऊन गेला. दादा म्हणेल म्हणेल तशी मी तिथे उडी मारली, पण आता नाही... : श्रीनिवास पवार
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले सर्व कुटुंब विरोधात असल्याचे भावनिक होत बारामतीत सांगितले होते. तसेच घडत आहे. शरद पवारांना दगा देणे पवार कुटुंबियांना आवडलेले नाही. सख्खा पुतण्या विरोधात उतरलेला असताना आता आजवर चांगल्या वाईट काळात साथ देत आलेला त्यांचा सख्खा भाऊ देखील विरोधात गेला आहे. श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत येत गावकऱ्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मी अजित दादांच्या विरोधात कसा बोलतोय. मी नेहमी दादांसोबत राहिलो. चांगल्या काळात, वाईट काळात पण मी त्याची साथ दिली. तो म्हणेल तशी मी तिथे उडी मारली. त्याने जे जे निर्णय घेतले त्याला साथ दिली. कधी मी त्याला विचारले नाही की असे का? पण जेव्हा आमची चर्चा झाली. तेव्हा मी त्याला म्हटले आमदारकी तुझ्याकडे आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. गावकरी म्हणून सगळ्यांना माहितीयेत. साहेबांचे वय आता ८३ झाले, त्यांना सोडणे मला पटले नाह, असे श्रीनिवास पवार म्हणाले.
माझे काही मित्र म्हणाले आता इथून पुढे दादांची वर्षे आहेत. साहेबांची काही नाहीत. तो विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. का तर आपण पुढची १० वर्षे दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, याच्यासारखा नालायक माणूस नाही, असे माझे वैयक्तीक म्हणणे आहे, असे पवार म्हणाले.
आता आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात. तुम्ही तिथे कसता, याचा अर्थ असा नाही त्यांनी सगळे शेत आपल्याला दिले. जमीन आपल्या नावावर केली म्हणजे त्यांना घराबाहेर काढायचे होत नाही. ज्यांना कोणाला पदे मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतपर्यंत. त्याच माणसाला म्हणायचे घरी बसा, कीर्तन करा. हे बरोबर नाही. माझ्या मनाला पटणारे नाही. मी राजकारणी नाही, वेगळा माणूस आहे. मला जे पटत नाही ते मी करत नाही, असेही पवार यांनी सांगितले.
माझे शाळेतले मित्रसुद्धा मला न सांगता गेले आहेत. आपण औषध विकत आणतो त्यावर एक्सपायरी डेट असते. तशीच काही नात्यांनाही एक्सपायरी डेट असते. तसेच समजावे आणि पुढे जावे. मला ६० वर्षे झालीत. मला जगून मरायचे नाहीय, आणि जगून जगायचे नाहीय. आता जगायचे तर स्वाभिमानाने जगायचे आहे, अशा शब्दांत पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
साहेबांनी काय केले?
आहोत तोवर चांगले काम करा, मला नाही वाटत त्यांना झोप लागत असेल. साहेबांनी काय केले? याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. ज्या काकांनी चारवेळा उपमुख्यमंत्री केले. २५ वर्षे मंत्री केले. तरीसुद्धा म्हणायचे काकांनी माझ्यासाठी काय केले. असा काका मला मिळाला असता तर मी पण खूश झालो असतो. ही भाजपाची चाल आहे, आरएसएसची सुरुवातीपासूनची चाल होती. त्यांना शरद पवार यांना संपवायचे होते. इतिहासात तेच झालेय, घरातील व्यक्ती फोडली तर कोणताही माणूस संपविता येतो. कारण घरातलाच घरच्यांना घाबरत नाही. इथून पुढे मी बोलणार आहे, मनमुक्त बोलणार आहे. मी काही लाभार्थी नाही, अशा शब्दांत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली.