पुणे - एकेकाळी रिक्षा चालवणारा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला अशी ओळख एकनाथ शिंदेंबाबत सातत्याने सांगितली जात आहे. त्यामुळे रिक्षावाला ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदेंची सोशल मीडियात भलतीच चर्चा रंगली आहे. त्यात फेसबुकवर एका दाढीवाल्या रिक्षाचालकाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा रिक्षा चालवत होते तेव्हाचा असल्याचा दावा केला जात होता. मात्र अनेकांनी या फोटोची सत्यता समोर आणली.
आता व्हायरल होणाऱ्या या फोटोचं कुतुहल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही पडले. अजितदादांनी त्यांचे स्वीय सहाय्यक सुनिल मुसळे यांनी या रिक्षाचालकाला फोन लावण्यास सांगितले. हा दाढीवाला रिक्षाचालकाचा फोटो जसा सामान्य माणसं व्हायरल करत आहेत तसा तो फोटो राजकारण्यांनीही शेअर केला. मुसळे यांनी या रिक्षाचालकाचा फोन अजित पवारांना जोडून दिला. त्यानंतर अजित पवारांनी थेट व्हायरल रिक्षाचालकासोबत संवाद साधला.
अजित पवार म्हणाले की, बाबा, तो फोटो तुझा हाय का रे? शिंदेचा फोटो, शिंदेंचा फोटो आहे असं सांगतायेत, त्यावर रिक्षाचालकाने उत्तर दिलं की, मी आळंदीत वारकरी संप्रदायाचं धार्मिक शिक्षण घेत होतो. त्यानंतर वडील म्हणाले काहीतरी काम कर. वडिलांनी रिक्षा घेऊन गेली. त्याकाळी पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा स्टँड होतं. रात्रभर मुंबईहून प्रवासी तिथे यायचे. तेव्हा रात्री प्रवाशांची गैरसोय व्हायची. त्यामुळे या प्रवाशांना रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. त्यातून रातराणी रिक्षा स्टँड सुरू केले. त्या रिक्षा स्टँडचे अध्यक्ष मला केले. दरवर्षी श्रावण महिन्यात पुणे-पिंपरी चिंचवडमधील रिक्षाचालक त्यांच्या रिक्षाची पूजा करतात. १९९७ मध्ये आम्ही रिक्षाची पूजा आयोजित केली होती. त्यातील हा फोटो आहे असं सांगताच दादा हसले अन् म्हणाले भुजबळसाहेबांनी मला फोटो पाठवला, तेच नक्की कळत नव्हतं. आता मला एकाने सांगितले तो बाबाचा फोटो आहे त्यावेळचा. ठीक आहे, काम करत राहा, धन्यवाद यावर बाबा कांबळेंनीही फोन केल्याबद्दल अजित पवारांचे आभार मानले.
काय आहे प्रकरण?फुलांच्या माळांनी सजवलेल्या रिक्षासोबत एक दाढीवाला तरुण उभा आहे. रिक्षाचा क्रमांक आहे, MH14 8172. हा फोटो १९९७ चा असून त्यात दिसणारा तरुण रिक्षावाला म्हणजेच आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसून 'महाराष्ट्र रिक्षा पंचायत'चे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचं 'लोकमत'च्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे.
Fact Check: 'ते' एकनाथ शिंदे नाहीत; जाणून घ्या, रिक्षासोबत उभा असलेला तो दाढीवाला तरुण नेमका कोण!