पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने आज अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समिकरणे बदलली असून, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचेमुख्यमंत्री बनतील, असे दावे अजित पवार यांचे समर्थक आणि राज्यातील विरोधी पक्षांमधील नेत्यांकडूनही करण्यात येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबच्या चर्चांबाबत अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी या चर्चा स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत.
आज अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या आम्हाला जी जबाबदारी मिळालीय, व्यवस्थित पार पाडू द्या. यावेळी अजित पवार यांच्या समर्थकांकडून लावण्यात आलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या बॅनरबाबत म्हणाले की, काही जणांनी समाधानासाठी बॅनर लावले असतील.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत, असं विचारलं असता. सध्या गरजेपुरते आमदार माझ्यासोबत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.