मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना अद्याप सिंचन घोटाळा प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) स्पष्ट केल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बाणगंगा धरणाच्या प्रकल्पात झालेल्या घोटळ्याप्रकरणी ५ जून रोजी एसीबीला एक पत्र पाठवून केलेल्या प्रश्नांना उत्तर पाठविताना एसीबीने पवारांबाबत हे उत्तर पाठविले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जलसंपदा मंत्री असल्यापासून सिंचन प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने जानेवारी २०१५मध्ये एसीबीला या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेल्या १३ सिंचन प्रकल्पांपैकी बाणगंगा धरण प्रकल्प एक असून, ठाणे एसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती. या प्रकरणी ईडीने ५ जून रोजी एसीबीकडून सिंचन घोटाळ्याबाबत माहिती मागवली होती. सिंचन घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एसीबीने दोन गुन्हे दाखल करून न्यायालयात आरोपपत्रही दाखल केली आहे. पवारांची चौकशी करूनही आरोपपत्रात त्याचे नाव देण्यात आले नसल्याच्या प्रश्नासह काही त्रुटींबाबात एक पानी प्रश्नांची उत्तरे ईडीने एसीबीकडून मागितली होती. त्यात मंजुरी प्राधिकरणाच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात आलेले प्रत्यक्ष काम, कामाचा खर्च, संबंधितांचे नोंदविलेल्या जबाबांसह सध्या या गुन्ह्याच्या असलेल्या स्थितीबाबत माहिती मागविली होती. त्यात अद्याप पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलेली नाही, तरीही मंजुरी प्राधिकरण म्हणून त्यांची भूमिका या विषयावर तपास सुरू असल्याचे एसीबीने ईडीला कळविल्याची माहिती मिळते.
अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 5:05 AM