मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे.
आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, डी.पी.त्रिपाठी, अजितदादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार आणि विधान परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.