"आरोपींचे *** काढून टाकलं पाहिजे"; बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन अजित पवार संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 04:06 PM2024-08-24T16:06:02+5:302024-08-24T16:17:00+5:30
यवतमाळमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदलापूर प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे.
Ajit Pawar :बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीने चिमुरड्या मुलींवर लैंगिंक अत्याचार केले. ही अत्याचाराच्या घटनेप्रकरणी आठवड्याभराने गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले होते. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केलीय. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना अशा आरोपींचे गुप्तांगच छाटलं पाहिजे असं म्हणत संपात व्यक्त केला.
बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे बदलापूरच्या प्रकरणानंतर राज्यातील आणखी अत्याचाराची खळबळजनक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. राज्य सरकारने या प्रकरणात एसआटीमार्फत चौकशी करुन आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच यवतमाळमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी अशा घटनांविषयी रोष व्यक्त केला.
"जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या. त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याला कडक शासन करणार. आमचा तर प्रयत्न सुरु आहे. शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे. तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे. माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं, ज्यावेळेस आमच्या आई-बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस त्यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांच्या मनातही असा विचार येणार नाही," असं अजित पवार म्हणाले.
"माझ्या भाषेत सांगायचे तर सामानाचं काढून टाकलं पाहिजे. परत नाहीच. काही लोक इतके नालायक आहेत की हे केलंच पाहिजे. छत्रपतींनी आपल्याला काय शिकवलं आहे आणि आज लोक कशा पद्धतीने नालायकपणा करत आहेत. अशा लोकांविरोधात सरकारने कठोर भूमिका स्वीकारलेली आहे," असंही अजित पवार म्हणाले.