"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 09:54 AM2024-10-05T09:54:39+5:302024-10-05T09:55:15+5:30
शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
Ajit Pawar On Sunil Tingre : पुण्याच्या पोर्शे अपघात प्रकरणात अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांना विरोधकांनी लक्ष्य केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीही पुणे अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली होती. अपघातानंतर सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे शरद पवारांनी म्हटलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील टिंगरेंची पाठराखण केली आहे.
पुण्यातील खराडी येथे एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरेंवर घणाघात केला होता. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दोघे ठार झाले होते. या घटनेनंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते. यावरुनच आमदार सुनील टिंगरेंनी आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. तसेच तू सोडून गेला ते ठिक आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू', असा इशारा शरद पवारांनी दिला होता. यावरुन आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आला? हा पक्ष कोणी काढला, सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली. तू सोडून गेला, ते ठीक आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू. दोन तरुण मुलांना त्यांनी उडवलं काय, जागच्या जागी त्यांची हत्या काय होते. अशा वेळी जे जखमी झाले, त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती का?," असा सवाल शरद पवार यांनी केला.
शुक्रवारी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या मतदारसंघात अजित पवारांनी वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी सुनिल टिंगरेंची पाठराखण केली. मध्यंतरी आमच्या सुनिल टिंगरेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, असं अजित पवार यांनी म्हटलं.
"अलीकडच्या काळात इकडचे तिकडे जाऊ लागले आहेत, लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, मी त्यावर टिप्पणी करणार नाही. एक लोकप्रतिनिधी ज्याने नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलं, सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या सुनिल टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी केला," असे अजित पवार म्हणाले.