अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 02:16 PM2024-05-29T14:16:25+5:302024-05-29T14:18:01+5:30
पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - Umesh Patil on Anjali Damania ( Marathi News ) पुण्यातील दुर्घटना दुर्दैवी, संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. या प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू आहे. दोषींना मदत करणाऱ्या २ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीय. ब्लड सँम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांना अटक झालीय. कायद्याच्या प्रक्रियेने योग्य ती कारवाई सुरू आहे. जर यात कुणाचा हस्तक्षेप असता तर कारवाई झालेली दिसली नसती. मग अंजली दमानिया यांचा बोलविता धनी कोण? त्यांचेच कॉल रेकॉर्डिंग आणि नार्को टेस्ट करण्याची गरज आहे असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.
उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, डोंबिवली कंपनीत स्फोट, उजनीत बोट बुडाली यासारख्या दुर्घटना गेल्या १०-१५ दिवसांत झाल्या. या दुर्घटनेबाबत अंजली दमानिया संवेदनशील असल्याचं दिसल्या नाहीत. दमानिया यांना नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. या दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न शासन यंत्रणा करत असते. परंतु जाणीवपूर्वक पुण्याच्या घटनेवरून राष्ट्रवादीला आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा उद्योग सुपारी घेऊन काही लोकांनी चालवला आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच राज्यात १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याच्या दुर्घटनेनंतर गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत पुण्याच्या प्रकरणावर कारवाईचे आदेश दिले. त्याचवेळी मंत्रालयात दुष्काळाबाबत आणि पाणी टंचाईबाबत अजित पवार अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. मतदान संपल्यानंतर अनेक नेते काश्मीरपासून जगभरात विश्राम घ्यायला गेले असताना मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार मंत्रालयात सकाळी ८ वाजता काम करत होते. ३५ वर्ष महाराष्ट्र अजित पवारांना पाहतोय. लोकांची कामे करतात म्हणून अजितदादा लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतात. तुम्हाला कुणी निवडून दिलंय? आपण ग्रामपंचायतीत तरी निवडून आलात का? एखादी निवडणूक लढवून आपल्या पाठीशी किती लोक आहेत हे तपासा असंही उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सातत्याने बिनबुडाचे आरोप करणं चुकीचे आहे. दमानियांकडे पुरावे काय?, पालकमंत्री म्हणून आयुक्त, जिल्हाधिकारी यांना फोन करणं, आढावा घेणे त्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्र्यांचे काम असते. अंजली दमानियांना विचारून फोन करायचा का? काम करणारा माणूस सातत्याने काम करत असतो. अंजली दमानिया यांनी राज्यात इतर दुर्घटना घडल्यात, त्यातील मृत्यूबाबतही संवेदनशीलता दाखवायला हवी होती असंही राष्ट्रवादीनं सांगितलं आहे.