रात्री अडीचला एक्स्प्रेस वेवर दिला एबी फॉर्म; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीची सांगितली कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:48 IST2025-03-27T13:47:33+5:302025-03-27T13:48:18+5:30
हा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं

रात्री अडीचला एक्स्प्रेस वेवर दिला एबी फॉर्म; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीची सांगितली कथा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष झालेले अण्णा बनसोडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री अडीचला उमेदवारीचा एबी फॉर्म कसा दिला याचा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितला.
बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पवार म्हणाले, '२०१९ मध्ये बनसोडे यांना उमेदवारी दिलेली नव्हती. मी तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना म्हणालो, अण्णाचे तिकीट कापू नका, तर ते म्हणाले, पक्षात सगळेच काही माझे चालत नाही. मी पक्षाचा नेता असल्याने जयंत पाटील यांनी मला काही जास्तीचे एबी फॉर्म मला दिले होते. त्यातलाच एक मी बनसोडे यांना एक्स्प्रेस वेवर रात्री अडीचला बोलावून दिला. ते म्हणाले, पक्षाने तर सुलक्षणा शीलवंत यांना तिकीट जाहीर केले आहे, मी म्हणालो, त्याचे तुला काय करायचे, उद्या सकाळी बरोबर ११ ला जाऊन उमेदवारी अर्ज भर. त्यानुसार बनसोडे यांनी अर्ज भरला आणि ते १७हजार मतांनी जिंकले.'
माझे त्यांनी ऐकले, फॉर्म भरला, जिंकले, आज उपाध्यक्ष झाले. राजकारणात माझे ऐकले तर किती भले होते बघा! अशी कोपरखळी अजित पवार यांनी शरद पवार गटाला मारली.
'...आणि त्यांचे मत बदलले'
बनसोडे यांचे अभिनंदन करताना जयंत पाटील यांनी दावा केला की, बनसोडे यांच्याऐवजी दुसऱ्याला तिकीट द्यायचे हे मी आणि अजितदादांनी मुंबईत बसूनच ठरविले होते पण दादा पिंपरीला गेले, तिथे त्यांना घेराव घालून बनसोडे यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली आणि त्यांचे मत बदलले.