Ajit Pawar, Winter Session at Nagpur: 'टीईटी' घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज भर सभागृहात राग अनावर झाला. एखादा प्रश्न तारांकित होण्यासाठी ज्या अटींची गरज असते त्यापैकी कोणती अट पूर्ण न झाल्याने हा भाग वगळला गेल्या, असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. तर हा प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला आहे.
नक्की सभागृहात काय घडलं?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीईटी घोटाळ्या संबंधी तारांकित प्रश्न सूचना क्र. ५०४९१ दाखल केली होती. दाखल केलेला प्रश्न सात भागांचा होता. मात्र प्रश्नोत्तराच्या यादीत मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित दोन भाग विधानमंडळ सचिवालयाने जाणीवपूर्वक वगळले, असा आरोप अजितदादांनी केला. या टीईटी घोटाळ्यामुळे मेरीटच्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ७० मध्ये एखादा प्रश्न स्वीकृत व्हावा, यासाठी त्या प्रश्नाने एकूण १८ शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या प्रश्न सुचनेतील वगळलेला प्रश्न भाग १८ शर्तीमधील नेमक्या कोणत्या शर्ती पूर्ण करीत नाहीत, हे मला कळले पाहिजे, असा जाब अजित पवारांनी विचारला.
तारांकित प्रश्न सुचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री व सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाईकांचा समावेश आहे. संबधित शिक्षकांवर ६० दिवसांत सुनावणी घेऊन कारवाई करा, असे आदेश आहे. असे असताना केवळ काही मंत्री महोदयांची, काही आमदार महोदयांची व काही अधिकाऱ्यांची मुले या घोटाळ्यात असल्याने कारवाईला उशीर होत आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
काय आहे टीईटी घोटाळा? आरोपी कोण?
- २०१९-२०२० या काळात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibily Test) घेण्यात आली होती. या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले. पुणे सायबर पोलिसांनी या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
- या घोटाळ्यात ७ हजार ८८० उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले.
- या घोटाळ्यात पुणे पोलिसांकडून शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक झाली आहे. तसेच शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव ढेरे, जीए टेक्नोलॉजी कंपनीचे प्रमुख प्रीतेष देशमुख आदींवर कारवाई करण्यात आली आली आहे.
मंत्री अब्दुल सत्तारांचे कनेक्शन काय?
पुणे पोलिसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी ज्या बोगस शिक्षकांची यादी पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे, त्यात औरंगाबादचे शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावेही आले होते. त्यामुळे पात्र नसतानाही सत्तार यांच्या मुलीने शिक्षकाची नोकरी केल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीतून उघड झाल्याचा दावा करण्यात आला. अब्दुल सत्तार यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. सत्तार यांच्या तीन मुलींची नावं या घोटाळ्यात असल्याचे निष्पन्न झाले. तर दोन मुलांचाही सहभाग असल्याचा आरोप केला गेला. आता या प्रकरणी ईडी मार्फत चौकशी केली जात आहे.