मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली जात असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर यापूर्वीच खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर मला अधिक काही बोलायचे नाही. नवाब मलिक यांनी भूमिका मांडली, तीच भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिलेली तक्रारदार महिला पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. रेणू शर्मा असं या महिलेचं नाव असून ती डी.एन. नगर पोलीस ठाण्यात जबाब दाखल करण्यासाठी पोहोचली आहे. डी.एन. नगर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या देखरेखीखाली जबाब नोंदवला जाणार आहे.
तत्पूर्वी, एकीकडे विरोधक आक्रमक झाले असताना धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली. तसेच धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीस मुंडे उपस्थित होते. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत धनंजय मुंडे द्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेवटी, शरद पवार त्यांना काय आदेश देतात, यावरच सगळे अवलंबून असेल, असे मानले जाते. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे.