अजितदादांनी शब्द दिल्याने शिंदे-मिटकरी यांच्यात विधान परिषदेसाठी चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:25 AM2020-01-06T11:25:50+5:302020-01-06T11:26:53+5:30
अजित पवार यांनी निकाल लागताच पराभुतांना विधान परिषद मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवारांच्या मर्जीतील असल्यामुळे शिंदे याला अपवाद ठरू शकतात. मात्र ऐनवेळी काहीही घडू शकते.
मुंबई - विधानसभा निवडणूक उरकली असून सत्तावाटपही झाले आहे. आता विधानसभेतून हुकलेल्या नेत्यांना विधान परिषदेचे वेध लागले आहे. त्यासाठी अनेक जण आश्वासनांवर तर काही जण आपल्या ताकदीनुसार विधान परिषदेवर जाण्याची मागणी पक्षाकडे करत आहे. या जागांसाठी चांगलीच चुरस लागणार असं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पहिल्या जागेसाठी चुरस लागली आहे.
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे असून या जागेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि स्टार प्रचारक अमोल मिटकर इच्छूक आहेत. दोन्ही नेते राष्ट्रवादीसाठी महत्त्वपूर्ण मानले जातात.
दरम्यान अजित पवार यांनी आधीच विधान परिषदेची रिक्त होणारी पहिला जागा अमोल मिटकरी यांना देणार असल्याची घोषणा केली आहे. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे मिटकरी यांच्या आमदार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचवेळी या जागेसाठी शिंदे यांचाही विचार होत आहे. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू मानले जातात. साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये गेले असताना शिंदे यांनी एकाकी झुंज देत पक्षाच्या विजयासाठी लढा दिला होता. मात्र ते स्वत: थोड्या फरकाने पराभूत केले.
शशिकांत शिंदे यांचा पराभव शरद पवार यांच्यासाठी त्रासदायक होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विजयीसभेसाठी सातारला जाणे देखील पवारांनी रद्द केले होते. त्यामुळे शिंदे सभागृहात असावे अशी पवारांची इच्छा दिसते. तर अजित पवार यांनी निकाल लागताच पराभुतांना विधान परिषद मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवारांच्या मर्जीतील असल्यामुळे शिंदे याला अपवाद ठरू शकतात. मात्र ऐनवेळी काहीही घडू शकते. अर्थात या जागेसाठी मिटकरींना आमदार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शब्द चालणार की, शरद पवारांवरची निष्ठ शशिकांत शिंदेंना कामी येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.