NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा केला. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील निवडणुकीवेळी शरद पवार गटाने अजित पवार गटावर प्रतिज्ञापत्रांवरून मोठे आरोप केले होते. या सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहू शकतात, असे सांगितले जात आहे.
मागील सुनावणीवेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली होती. मात्र, ते मुद्दे अजित पवार गटाने खोडून काढले होते. यानंतर आता पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणीपूर्वी दिल्लीत शरद पवार गटाची एक बैठक होऊ शकते, अशी चर्चा आहे. ०२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणी अजित पवार गटाने सलग सुनावणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सलग सुनावणी घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत
अजित पवार गटाकडून सलग सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. सुनावणीत काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत, असे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले होते. निवडणूक आयोगापुढे ०२ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला. अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले. अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत अजित पवार यांच्याकडे काहीच समर्थन नसल्याचा दावाही करण्यात आला होता.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगात होणाऱ्या या सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. सुनावणीच्या आधी दिल्लीत शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत रणनिती ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.