'घड्याळ तेच, वेळ नवी, अजित पवारांच्या पर्वाची सुरूवात'; आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:36 PM2023-11-06T18:36:06+5:302023-11-06T18:36:32+5:30
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यापैकी जवळपास २२०७ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहे. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर काँग्रेससोबतच शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाल्याची पाहायला मिळत आहे.
महायुतीने १३३५ ठिकाणी बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला ५२६ जागांवर समाधान मानवे लागले आहे. तर इतर ३४६ जागांवर विजयी झाले आहे. यामध्ये भाजपा ६५४, अजित पवार गट ३९२, शिंदे गट २८९, काँग्रेस २७१, शरद पवार गट १४५, ठाकरे गट ११० जागांवर विजयी झाले आहेत. भाजपानंतर अजित पवार गटाला सर्वाधिक यश मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवार गटाने ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत जे राष्ट्रवादीला यश लाभले, त्याबद्दल ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाल आहे. घड्याळ तेच, वेळ नवी अजित पवारांच्या पर्वाची सुरूवात झाली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत अजित पवारांना असचं यश मिळेल, असा अजित पवार गटातील नेते आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महायुतीच्या या विजयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. हे महायुतीवरील मतदारांचं प्रेम आहे, मतदारांचा विश्वास आहे. मी जनतेला धन्यवाद देतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, तसेच महिलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. शासन सर्वांच्या दारी पोहोचलं आहे. आणखी जोमाने आम्ही काम करु, असं एनकाथ शिंदे म्हणाले. सर्व समाजाने आम्हाला पाठबळ दिलं, आशिर्वाद दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी दाखवून दिलं, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.