राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती तर मिळाली, पण पालकमंत्रिपदाचं काय? अजित पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:54 PM2023-07-15T12:54:26+5:302023-07-15T12:54:54+5:30

संजय राऊतांच्या दाव्याचाही अजितादादांनी घेतला समाचार

Ajit Pawar group of NCP ministers got departments but what about the guardian ministry read more details | राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती तर मिळाली, पण पालकमंत्रिपदाचं काय? अजित पवार म्हणतात...

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती तर मिळाली, पण पालकमंत्रिपदाचं काय? अजित पवार म्हणतात...

googlenewsNext

Aijt Pawar in Shinde Fadnavis Govt: राज्यात दोन आठवड्यापूर्वी राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत समाविष्ट झाला. त्यांच्या ९ मंत्र्यांचा शपथविधीदेखील झाला, पण राज्य मंत्रिमंडळ त्यांना खाती मिळाली नव्हती. अखेर शुक्रवारी खातेवाटप झाले. नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपा बरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते देण्यात आले. अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजितपवार नाशिक दौऱ्यावर होते. खातेवाटप झाले पण पालकमंत्रिपदाबाबत काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी खुलासा केला. त्याशिवाय, संजय राऊत यांच्या दाव्यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 

राष्ट्रवादीचा अजित पवार गट जेव्हापासून सत्तेत सहभागी झाला तेव्हापासून शिंदे गटातील आमदार काहीसे नाराज झाले होते. ज्यांच्याविरोधात आम्ही दंड थोपटले त्यांच्यासोबतच सत्तेत बसावे लागेल अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच, अजित पवार गटातील काही आमदारांना पालकमंत्री देण्याच्या चर्चांवरूनही शिंदे गटाच्या आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काल खातेवाटप झाले पण पालकमंत्रीपद अद्याप जाहीर झाले नाही. त्यावरून अजित पवारांना विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, "आम्ही सध्या सभांची तयारी करत आहोत. आमच्या गटावर कोणीही टीका केली तरी आम्ही उत्तर सभा घेऊ. काळजी करू नका. आम्ही अनुभवी असल्याने आम्हाला काही उत्तर देताना अडचण येणार नाही. पण पालकमंत्रीपदाच्या गोष्टींसाठी पाच सहा दिवस जाऊद्या. पालकमंत्री पदांबाबत लवकरच चर्चा होईल."

संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचे उत्तर

खासदार संजय राऊत म्हणाले की, "अर्थ खाते शिंदे यांच्या गटाकडे ठेवायचे असेल तर अर्थखाते घ्या आणि मुख्यमंत्रिपद अजित पवारांकडे द्या, असा प्रस्ताव दिल्लीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर ठेवला. या प्रस्तावावर शिंदे गट माघारी फिरले आणि अर्थ खात्याचा कौल अजित पवारांच्या बाजूने गेला. राहायचे असेल तर राहा, अन्यथा जा, अशा शब्दात दिल्लीतून शिंदेंना आदेश दिला ही माझी पक्की माहिती आहे", असा दावाही राऊतांनी केला. यावर अजित पवार म्हणाले- "या सगळ्या अफवा आहेत. यावर अजिबात विश्वास ठेऊ नका."

मोदींचा केंद्रात करिश्मा, त्यांच्याकडे जाऊन समस्या मांडणार!

"आम्ही जनतेत काम करणारे कार्यकर्ते आहोत. खातेवाटप झाले आहे, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू. मी अनेक वर्ष प्रशासनात असल्याने मला कामाची माहिती आहे. नवीन माणूस काहीतरी नवीन शिकत असतो. मला कार्यकर्त्यांना भेटायचं असल्याने लवकर आलो. सरकार चालवताना पहिल्यांदा लोकांची कामे केली पाहिजेत. काही जणं आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. अधिवेशनात समस्या सोडावणे सरकारचं काम आहे. 18 तारखेला NDA ची बैठक आहे, त्यात आम्ही पंतप्रधान यांना भेटून समस्या सांगणार आहोत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे करिश्मा असलेलं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात काम करू," असेही अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit Pawar group of NCP ministers got departments but what about the guardian ministry read more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.