अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 06:17 AM2024-10-03T06:17:51+5:302024-10-03T06:18:33+5:30
महायुती-मविआत जागावाटपाचे ‘घट’ बसणार. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शाह यांच्याशी मुंबई भेटीत चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महायुतीमध्ये आम्हाला विधानसभेच्या किमान ६५ जागा द्या, अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चेदरम्यान केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शाह यांच्याशी मुंबई भेटीत चर्चा केली. राष्ट्रवादीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५४ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय काँग्रेस व अपक्ष मिळून पाच आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच, आमच्याकडे जिथे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्या जागा आम्हाला द्या, असे या नेत्यांनी शाह यांना सांगितल्याचे कळते.
आमची मागणी अजिबात अवास्तव नाही. भरपूर जागा मागायच्या आणि महायुतीच्या जागावाटपात अडचणी निर्माण करायच्या अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही. आम्ही व्यवहार्य भूमिका घेऊनच आपल्याशी बोलत आहोत, असे या नेत्यांनी शाह
यांना सांगितले.
एकनाथ शिंदेंशी चर्चा
जागावाटपाबाबत आणि निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा केली.
मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्याचीच माझी भूमिका असते पण त्याचवेळी मित्रांनी अवास्तव मागणी करू नये, असे शाह या चर्चेत म्हणाल्याचे समजते.
शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल, त्यांच्याकडे असलेले स्वत:च्या पक्षाचे आमदार, सोबत असलेले अपक्ष आमदार याबाबतची माहिती शाह यांना दिली. तसेच, विधानसभा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात, अशी मागणी केली.
भाजप १६० जागा लढणार?
nभाजपने १६० मतदारसंघांमध्ये गेले दोन दिवस आपले निरीक्षक पाठवून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून लिफाफ्यामध्ये तीन पर्याय मागविले आहेत. याचा अर्थ भाजप १६० जागा लढणार, असा घेतला जात आहे.
nभाजपने जास्तीत जास्त १५५ जागा लढाव्यात, असा अजित पवार गट
आणि शिंदेसेनेचाही आग्रह असल्याचे म्हटले जाते.
‘चर्चा करा आणि फॉर्म्युला ठरवा’
तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी पुन्हा एकदा चर्चा करा आणि फॉर्म्युला ठरवा. बोटावर मोजण्याइतक्याच जागांवर तुमचे एकमत होणार नाही, हा माझा विश्वास आहे. ज्यावर एकमत होणार नाही तिथे मी स्वत: लक्ष घालेन, असे शाह यांनी या नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे.