अजित पवार गट राज्यसभा निवडणुकीचा व्हीप बजावणार? प्रतोद अनिल पाटलांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 08:00 PM2024-02-06T20:00:25+5:302024-02-06T20:00:48+5:30
शरद पवार यांना या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग मोकळा आहे.
राजकारणातले बाहुबली समजले जाणाऱ्या शरद पवारांना निवडणूक आयोगाने आज मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. यामुळे अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याचे परिणाम येत्या राज्यसभा निवडणुकीवर होताना दिसणार आहेत.
दरम्यान, शरद पवार यांना या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग मोकळा आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी पक्षाचे चिन्हांबाबत एक यादी सांगितली होती. आजच्या या निर्णयाला तोंड देण्याची पवारांची तयारी होती. आता राज्यसभा निवडणुकीचा व्हीप शरद पवार गटातील आमदारांना लागू करणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले याचा आनंद झाला आहे. राज्यात आता विधानपरिषद निवडणुका नाहीत. परंतु राज्यसभा निवडणूक आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जो निर्णय घेतील त्यावरून व्हीप काढायचा, लागू करायचा की नाही हे ठरविण्यात येईल असे, पाटील म्हणाले. मी २०१९ पासून पक्षाचा प्रतोद आहे. आजही आहे, असे पाटील म्हणाले.