मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षाचे पहिले निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद हा न्यायप्रविष्ट असून अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे’ अशी अजित पवार गटाने जाहिरात प्रकाशित केली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या जाहिरातीला आक्षेप घेत, हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याचा दावा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना वृत्तपत्रांव्दारे जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे आदेश दिले असून घड्याळ चिन्ह प्रकाशित करताना सर्वत्र इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीनही भाषेत महत्त्वाची नोंद नमूद करण्यास सांगितले आहे. अजित पवार यांना केवळ खटल्याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पोस्टर्स, बॅनर्स या प्रत्येक ठिकाणी घड्याळ चिन्हाचे वापर करताना ‘चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’, असे नमूद करणे अनिवार्य असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
सोयीस्कररित्या स्वार्थ... या जाहिरातींव्दारे जनतेची दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच अक्षरशः केराची टोपली दाखवण्याचे काम करण्यात आल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे. जनतेने अजित पवार गटाचा हा जाहिरातीमागील सोयीस्कररित्या साधलेला स्वार्थ लक्षात घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.