...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:43 PM2024-02-28T14:43:26+5:302024-02-28T14:44:24+5:30

मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल असं आमदार दिलीप मोहितेंनी सांगितले.

Ajit Pawar group's Dilip Mohite opposes taking Shivaji Adharao Patil into NCP | ...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

मुंबई - लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर होईल अशावेळी युती, आघाडी यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात कुणाला महायुती कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप निश्चित नाही. पण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील अशी चर्चा सुरू झालीय. त्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, नुसती चर्चा आहे. स्वागत करायचं की नाही हा जर तर चा भाग आहे. आयुष्यभर आम्ही त्यांना विरोध केलेला आहे. राजकारण करण्यापेक्षा घरी बसू. राजकारण तत्वाकरिता व्हायला हवं, आयाराम गयाराम राजकारण झाले तर त्याला काही अर्थ उरणार नाही. तसे राजकारण मला करायचे नाही. पक्ष त्यांचे स्वागत करेल. तो पक्षाचा निर्णय असेल पण वैयक्तिक जीवनात काय करायचा हा अधिकार मला आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल. मी करेन किंवा नाही करणार हा त्यावेळचा निर्णय असेल. माझ्या लोकांना मी विचारेल. पक्ष स्वागत करेल. माझे वैयक्तिक मत असे की मी गेल्या २० वर्षापासून त्यांच्याशी संघर्ष करतोय. त्यांनी अतिशय खालच्या पातळीचं राजकारण माझ्यासोबत केलंय. मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेन अशी ठाम भूमिका दिलीप मोहिते यांनी मांडली. 

दरम्यान, शिरूर मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र नंतर मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील या तिघांचीच बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत शिरूरची जागा आपल्याकडेच खेचण्यात अजित पवारांना यश आल्याचे समजते. त्यामुळे नाराज झालेले शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह वर्षा बंगल्यावरून बाहेर पडल्याचंही सांगितलं जात आहे. 

Web Title: Ajit Pawar group's Dilip Mohite opposes taking Shivaji Adharao Patil into NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.