अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:53 PM2023-09-13T12:53:19+5:302023-09-13T12:53:50+5:30
अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? असा सवालही विचारण्यात आला.
धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २ महिन्यापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सर्व ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका घेत शासनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याबाबत वेगवेगळे मतप्रवाह, टिकाटिप्पणी सुरू झाली. सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत, दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो. याचा अर्थ असा इंग्रजी आणि हिंदीवर चांगले प्रभुत्व असल्याने आणि शरद पवार नावाचे वलय त्यांच्यासोबत आहे. याचा वापर करून हा पक्ष किमान दिल्लीत तरी वाढायला हवा होता. वर्षातील १८० दिवस खासदार म्हणून तुम्ही दिल्लीतच होता. मग आजपर्यंत दिल्लीत साधा १ नगरसेवक निवडून आणता आला नाही अशी टीका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही सांगायचे. राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी मिझारोम, त्रिपुरा इथं त्यांच्या पातळीवर खासदार पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून येणार, केरळमध्ये १-२ आमदार येणार. गोव्यात पक्ष संपून गेला. महाराष्ट्रात हेलफाटे मारत बसण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवला असता तर आज पक्ष खूप मोठा झाला असता. माझे पक्षावर प्रेम आहे म्हणून मला वाटते. ज्यांचे व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह आहे, शरद पवार नावाचा पाठिंबा आहे. इतके असूनही देशभरात पक्ष वाढू शकला नाही त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत गोवा, गुजरात, मिझारोम, नागालँड, बिहार याठिकाणी अजित पवारांनी जाऊन पक्ष वाढवायचा का? अजित पवार एकटे राज्य सांभाळायला सक्षम होते. परंतु अजित पवारांनी कष्ट केल्यानंतर यांना डोके लावायचे होते म्हणून आज ही वेळ आलीय. आम आदमी पक्ष २ राज्यात सत्ता मिळवतो. संपूर्ण महाराष्ट्र आज पक्ष व्यापलेला नाही. देशाचे पंतप्रधानपदासाठी असलेले व्यक्तिमत्व असलेले शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. परंतु देशभरात पक्ष वाढवला नाही. अजित पवारांची कोंडी करायची आणि अडचण करायची आणि विनाकारण आपापले फोलोअर्स वाढवले, अजित पवारांनी महाराष्ट्र बघितला असता तर ही अडचण आली नसती असंही उमेश पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? त्यावर एकही बोलले नाहीत. हे असे चालत नसते. प्रफुल पटेल शरद पवारांची सावली म्हणून काम केले, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका घेतली ज्यांनी ४० वर्ष तुमच्यासोबत काम केले. हे लोकं विरोधात राहिले नव्हते का? आत्ताच हा निर्णय घ्यायची वेळ का आली. कुवत नसलेल्या माणसाच्या हातात पक्षाची सूत्रे द्यायचा प्रयत्न झाला तर पक्ष बुडणार हे निश्चित होते. त्यामुळे पक्ष वाचवण्यासाठी अजित पवारांनी जबाबदारी घेतली असंही उमेश पाटलांनी स्पष्ट केले.