अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता राजीनाम्याचा निर्णय?, कारण विचारताच म्हणाले होते...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 07:13 PM2019-09-27T19:13:19+5:302019-09-27T19:16:20+5:30
अजित पवार यांनी आज तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे. परंतु, आमदारकी सोडण्याचा निर्णय अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासा केला. 'दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपल्याला फोन केला होता. तुम्ही कुठे आहात एवढंच त्यांनी विचारलं होतं. मी त्यावेळी औरंगाबादला होतो. त्यानंतर, आज संध्याकाळी ५.४० वाजता त्यांनी विधानभवनातील माझ्या दालनात सागर नावाच्या 'पीएस'कडे स्वतःच्या हस्ताक्षरातील राजीनामा सोपवला. मी फोनवर त्यांना कारण विचारलं असता, आत्ता काही सांगत नाही, फक्त राजीनामा मंजूर करा, एवढंच ते म्हणाले' असं हरिभाऊ बागडे यांनी नमूद केलं. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेक नवे प्रश्न, शंका निर्माण झाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अजित पवार यांचे काका शरद पवार आज दुपारी ईडी कार्यालयात जाणार होते. त्यामुळे सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांची रीघ सिल्वर ओक बंगल्यावर लागली होती. त्यात अजित पवार कुठेच नव्हते. हा प्रश्न माध्यमांनी नेतेमंडळींना विचारला. त्यावर, अजितदादा त्यांच्या मतदारसंघात पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सहभागी झाल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. स्वतः शरद पवार यांनी आपल्यासमोरच त्यांना तसा सल्ला दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दावे कितपत खरे होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, आज सकाळपासून अजित पवार मुंबईतच होते आणि संध्याकाळी त्यांनी राजीनामा दिल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.
लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबात अंतर्गत कलह उद्भवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर, पार्थ पवार यांचा पराभव होणं आणि रोहित पवार प्रकाशझोतात येणं, हे लक्षवेधी ठरलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.