अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 06:03 PM2024-08-15T18:03:29+5:302024-08-15T18:19:34+5:30
एका मुलाखतीत बोलताना शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Ajit Pawar On Shiv Sena : तीन वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याच्या कारणामुळे शिवसेना पक्षात उभी फुट पडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नाही, डावललं जात असा आरोप करत शिवसेनेतून आमदारांनी बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी महायुतीत प्रवेश केला. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वेळ आली. अशातच आता पुन्हा राष्ट्रवादीसोबत सरकार चालवावं लागत असल्याने शिंदे गटात नाजारी असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवारांचा विरोध करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे नुकसान झाल्याचे मत आरएसएसच्या मुखपत्रातून व्यक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे अजित पवार महायुतीत आल्याने भाजप आणि शिंदे गटात नाराजी असल्याचे म्हटलं जात होतं. आता एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
"शिवसेना शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही अडीच वर्षे शिवसेनेसोबत सरकार चालवलं आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री केले. कोरोना काळात जगावर संकट आलं होतं. त्या संकटात प्रत्येकजण काळजीत होता. सर्वांना लस, रुग्णालयात बेड उपलब्ध करुन द्यायचे होते. त्यावेळी भरपूर काम करावं लागलं. त्यावेळी अडीच वर्षे आम्ही एकत्र काम केलं आहे. एकनाथ शिंदेंही आमच्यासोबत होते. मंत्रिमंडळात ते वरिष्ठ होते," असे अजित पवार म्हणाले.
या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत जाणार का या प्रश्नावरही भाष्य केलं. बारामतीत शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाणार का? असा सवाल अजित पवार यांना विचारला गेला. त्यावर अजित पवार यांनी 'नो कमेंट्स' असं उत्तर दिलं. माझी शरद पवारांशी स्पर्धा नाही पण मी माझ्या हिशोबाने पुढं जातोय आणि ते त्यांच्या हिशोबाने पुढे जातायेत, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.