अजितदादांच्या बंडात सामील 'या' नेत्याला मिळाले मंत्रीपद !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 12:37 PM2019-12-31T12:37:31+5:302019-12-31T12:37:54+5:30
अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्यात यश मिळवले. एवढंच नव्हे तर सोबत असलेल्या धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे यांना मंत्रीपदही मिळवून दिले.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची बोलणी सुरू असताना राज्यात राजकीय भूकंप झाला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची तर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हे सरकार कोसळले. मात्र त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत राहिलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी मंत्रीपद मिळवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांकडे सादर करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यासाठी राज्यावर असलेली राष्ट्रपती राजवट तातडीने उठविण्यात आली होती. तसेच सकाळी 8 वाजता फडणवीस आणि पवार यांनी शपथविधी उरकून घेतला होता. यावेळी राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवार यांच्यासोबत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांच्यासह भाजपची चांगलीच गोची झाली. त्यातच सोबत गेलेले आमदारच परत फिरल्याने अजितदादा देखील अडचणीत आले होते. संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे हे आमदार शरद पवारांकडे परत आले. तर धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे यांचा काहीही ठावठिकाणी नव्हता. मात्र अखेरच्या क्षणी धनंजय मुंडे देखील परत आले होते.
दरम्यान न्यायालयाच्या निकलांनंतर अजित पवार यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. यावेळी देखील अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्यात यश मिळवले. एवढंच नव्हे तर सोबत असलेल्या धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे यांना मंत्रीपदही मिळवून दिले. धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असून संजय बनसोडे यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.