राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज गोविंदबागेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले असताना बारामतीत असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार तिकडे गेले नाहीत. यावर सुप्रिया सुळेंनीअजित पवारांना डेंग्यू झाल्याने ते आले नसल्याचे म्हटले होते. परंतू, थोड्याच वेळात अजित पवार काटेवाडीत दिवाळीनिमित्त सजविलेले किल्ले पाहत फिरत असल्याचे दिसले आहे.
बारामतीतील गोविंद बागेत अजित पवारांच्या गटातील आमदारांनीही हजेरी लावली आहे. असे असताना अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत. त्यांनी काटेवाडीत धनी वस्तीला भेट दिली. देविदास काटे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या घरी अजित पवारांनी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले.
बारामतीतील शारदोत्सवाला ते मास्क घालून दिसले होते. अजित पवारांना डॉक्टरांनी मास्क लावण्याचा सल्ला दिला होता. परंतू, अजित पवार मास्क लावून फिरताना दिसले नाहीत. यानंतर त्यांनी काटेवाडीतील मुलांनी सजविलेल्या विविध ठिकाणच्या किल्ल्यांची पाहणी केली.
दिवाळी पाडव्याला अजित पवार आले नाहीत तेव्हा सुप्रिया सुळे काय म्हणालेल्या? अजित दादांना डेंग्यू झाल्याने ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. अर्धा ग्लास हा नेहमी अर्धाच असतो तो रिकामा नसतो, देवाने मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्या आणि यातून मी फार काही शिकले आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.