"काय करायचं ते तुमच्या घराबाहेर करा ना बाबा..."; अजित पवारांनी रांगड्या शैलीत समजावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 11:43 AM2022-04-24T11:43:37+5:302022-04-24T11:44:10+5:30
लोकशाहीच्या राजवटीत प्रत्येकाला त्यांच्या मर्जीनुसार वागण्याचं आणि प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण पोलिसांनी परिस्थिती पाहून तिथं न जाण्याची विनंती करुनही 'मातोश्री'वर जाण्याचा अट्टाहास कशाला?
नाशिक-
लोकशाहीच्या राजवटीत प्रत्येकाला त्यांच्या मर्जीनुसार वागण्याचं आणि प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण पोलिसांनी परिस्थिती पाहून तिथं न जाण्याची विनंती करुनही 'मातोश्री'वर जाण्याचा अट्टाहास कशाला? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. कायदा व सुव्यवस्थेबाबत नवीन प्रश्न निर्माण होतील असं कशाला वागायचं. अशा गोष्टी टाळायला हव्यात. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि तेथील आमदार रवी राणा यांनाही पोलिसांनी मातोश्रीवर जाऊ नये असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. शेवटी जे व्हायला नको ते झालं, असं अजित पवार म्हणाले.
"ज्यांना काही प्रार्थना करायची होती. त्यांना संपूर्ण अधिकार आहे. पण त्यांनी ती मंदिरात जाऊन करावी किंवा त्यांच्या घरी करावी. मातोश्रीबाबत शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यांच्यासाठी ते मंदिरासमान आहे. त्यांना अनेकवेळा पोलिसांनी समजावलं तरी ते थांबले नाहीत. शेवटी शिवसैनिक आक्रमक झाले. जे व्हायला नको ते झालं. ज्यावेळेस एखादा जमाव प्रक्षुब्ध असतो. तिथं जाणं योग्य नाही. काय करायचं ते तुमच्या घराबाहेर करायचं ना बाबा", अशा शब्दात अजित पवार यांनी मुंबईत काल घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
"प्रत्येकाला कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य आहे. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागायला हवं. राज्यकारभार करत असताना सगळीकडे शांतताच राहायला हवी. कोणालाही त्रास होता कामा नये. ही भावना असते. तपास यंत्रणा म्हणून आणि कायदा व सुव्यवस्था म्हणून काम करणं हे पोलिसांचं काम आहे. ते त्यांचं काम करतील. केंद्राची सुरक्षा असो किंवा नसो. कुणावरही हल्ला होता कामा नये. आपण कुणालाही उचकवण्याचाही प्रयत्न करू नये", असं स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.