अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:57 PM2024-01-08T19:57:14+5:302024-01-08T20:13:37+5:30
अजित पवारांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
Supriya Sule Vs Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वयावरून टीका केली होती. काही लोक ८४ वर्ष झाले तरी अजून थांबत नाहीत, असं ते म्हणाले होते. अजित पवारांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. "अजितदादा ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन आहेत," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच भारतीय संविधानानुसार त्यांनी राजकारणातून कधी निवृत्त व्हायचे? हा त्यांचा अधिकार आहे, असा टोलाही सुळे यांनी लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात शहरातील विविध प्रश्नांबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व आदरणीय पवार साहेबांची पॉलिसी ही कधीच एका व्यक्तीवर बोलण्यासाठी राहिलेली नाही. अरेला कारे म्हणणे सोपे असते. त्याला ताकद लागत नाही, पण शांत बसून सहन करण्यासाठी जास्त ताकद लागते. आज महाराष्ट्र दिल्लीच्या आदेशाने चालत आहे; राज्याला नेतृत्व नाही," असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
पुण्यातील प्रश्नांवरून सरकारवर टीका
सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की, "राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास थांबला आहे; सर्वसामान्य मायबाप जनतेने आपले प्रश्न मांडायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज, पाणी व रस्ता यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी पुण्यातील लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. पोलीस यंत्रणा व पुणे मनपाचे ट्रॅफिक वॉर्डन्स यांच्या सुसंवाद नसल्याने पुण्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आहे; ती सुरळीत करण्यासाठी पालिकेला सूचना केल्या आहेत. पुण्यात जानेवारी महिन्यातच पिण्याचे पाणी, गुरांचे पाणी व शेतीच्या पाण्याची कमतरता जाणवत असून त्यासाठी आवर्तन येणे गरजेचे आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात पुण्याला २४ × ७ पाणी देण्याचे आश्वासन होते पण तसे होताना दिसत नाही; सरकारला विनंती आहे की हा प्रश्न लाईटली घेऊ नका. कांदा व दुधाला भाव नाही आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते; ही गरिबांची चेष्टा आहे. 'जलजीवन मिशन' हा प्रोग्रॅम चांगला आहे पण त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही त्यात कमतरता जाणवते. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर बोलायचे नाही व चर्चा करायची नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. भ्रष्ट जुमला पार्टी पुणेकरांना फसवून सत्तेत आली आहे; त्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत. पुण्याचा विकास आराखडा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे; तो लवकर पूर्ण झाला पाहिजे," अशी मागणी सुळेंनी केली आहे.
दरम्यान, "निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे; आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्षाचे ३६५ दिवस आणि २४ तास निवडणुकांसाठी तयार असतो; अदृश्य शक्तीची आम्हाला भीती वाटत नाही," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.