मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. या भेटीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली.परंतु माध्यमांना याची कुणकुण लागताच सर्व कॅमेरे उद्योगपतीच्या घराबाहेर लागले. तितक्यात शरद पवारांची कार बंगल्याबाहेर पडली. त्यानंतर अर्धा तासाने अजितदादाने माध्यमांना चकवा देत बाहेर पडले. यावर संजय राऊतांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार-अजित पवारांच्या भेटीचं माध्यमांमधून ऐकलं. अद्याप दोन्ही नेत्यांनी यावर भाष्य केले नाही. नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी भेटू शकतात. मग अजित पवार-शरद पवार का भेटू शकत नाहीत? शरद पवार यावर दोन दिवसांत बोलतील कळाले आहे. कदाचित इंडियाच्या बैठकीला सामील होण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांना निमंत्रण दिले असेल. बाकी काय असणार आहे? असा टोला लगावला.
त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही गुप्त राहत नाही. राजकारणात काहीही घडू शकते. पहाटेच्या शपथविधीप्रमाणे परत फिरा आणि ३१ ऑगस्टच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी व्हावे. सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये कुणीही खुश नाही. या सरकारची अत्यंत अवस्था बिकट आहे. अजित पवारांपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत कुणीही सरकारच्या कारभारावर खुश नाही. जनता तर अजिबात खुश नाही. राजकारणातील उलथापालथ होईल असं बोलले जाते. त्याची दुसरी बाजूसुद्धा आहे. ती तुम्हाला लवकरच कळेल असं विधानही खासदार संजय राऊतांनी केले आहे.
वाराणसी जिंकणं मोदींना कठीण जाईल
आम्ही दिल्लीत आहोत. राष्ट्रीय राजकारण पाहत असतो. वाराणसीतून प्रियंका गांधी उभ्या राहिल्या तर मोदींना वाराणसी जिंकणे कठीण जाईल. प्रियंका गांधी जिंकतील अशी मला खात्री आहे. यावेळी अमेठी, रायबरेली, वाराणसी याचे वेगळे निकाल लागतील. देशाचे राजकारण पूर्णपणे बदलेल. राहुल गांधींच्या मागे देश उभा राहिले असे चित्र आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांमध्ये जी चिडचिड आहे ती राहुल गांधींना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आहे असा चिमटा खासदार संजय राऊतांनी भाजपाला काढला.