नवी दिल्ली-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ धमकीमुळेच त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे, असा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला आहे. तसंच शरद पवारांना विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्या नेत्याला द्यायचं होतं असंही मिश्रा म्हणाले.
अजयकुमार मिश्रा सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेवरही त्यांनी निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्यानं घेत नाही. कारण त्यांच्याच पक्षातील लोक राहुल गांधी यांना गांभीर्यानं घेत नाहीत, असं अजयकुमार मिश्रा म्हणाले.
मिश्रा म्हणाले, "तीन वर्षात ईडीने केलेल्या कारवाईतून देशाला तीनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप निराशेच्या भावनेतून होत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू, काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांची संख्या कमी झाली असून या ठिकाणी पर्यटनास चालना मिळाली आहे"